मुंबईतील १० लाख परवडणाऱ्या गृहप्रकल्पामध्ये शिक्षकांना घरे द्या, शिक्षक परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2018 14:39 IST2018-04-26T14:39:01+5:302018-04-26T14:39:01+5:30
मुंबई शहर व उपनगरांमध्ये १० लाख परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीमध्ये मुंबईत भाड्याने राहणाऱ्या व घर नसणाऱ्या शिक्षकांना प्राधान्याने घरे द्यावीत, अशी मागणी शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

मुंबईतील १० लाख परवडणाऱ्या गृहप्रकल्पामध्ये शिक्षकांना घरे द्या, शिक्षक परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : मुंबई शहर व उपनगरांमध्ये १० लाख परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीमध्ये मुंबईत भाड्याने राहणाऱ्या व घर नसणाऱ्या शिक्षकांना प्राधान्याने घरे द्यावीत, अशी मागणी शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. मुंबई शहर व उपनगरातील "ना विकास क्षेत्रातील जमीन" परवडणाऱ्या घरांच्या नावाखाली बांधकामासाठी खुली करण्याचा निर्णय राज्य शासनाने काल घेतला असून यामध्ये १० लाख घरे बांधली जाणार आहेत.
वाढती महागाई व मुंबईत घरांच्या किंमतीत झालेली प्रचंड वाढ यामुळे मुंबईत नोकरी करणाऱ्या शिक्षकांना व सरकारी कर्मचाऱ्यांना मुंबईत घरे घेणे शक्य नसल्याने शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने मुंबईबाहेर राहत आहे. वसई, विरार, नवी मुंबई, ठाणे, कल्याण व डोंबिवली येथून रोज प्रवासाची दगदग सहन करीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी लोकलने अपडाऊन करतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे रोज सरासरी ४ तास प्रवासात जातात. यामुळे मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ वाया जात असल्याचे सांगून शिक्षक व सरकारी कर्मचाऱ्यांना मुंबईत घरे आवश्यक असल्याचे अनिल बोरनारे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.