शिक्षकाची विद्यार्थ्याला काठीने मारहाण, मित्रांशी गप्पा मारल्याचा राग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 02:29 IST2017-09-29T02:29:44+5:302017-09-29T02:29:58+5:30
वर्गात मित्रांशी गप्पा मारल्या म्हणून एका नववीच्या विद्यार्थ्याला बेशुद्ध पडेपर्यंत काठीने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घाटकोपरमध्ये घडली.

शिक्षकाची विद्यार्थ्याला काठीने मारहाण, मित्रांशी गप्पा मारल्याचा राग
मुंबई : वर्गात मित्रांशी गप्पा मारल्या म्हणून एका नववीच्या विद्यार्थ्याला बेशुद्ध पडेपर्यंत काठीने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घाटकोपरमध्ये घडली. त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी शिक्षक शाम बहादुर विश्वकर्मा (३०) याला अटक केली.
घाटकोपर परिसरात तक्रारदार विद्यार्थी कुटुंबासह राहतो. येथील आॅक्स्फर्ड इंंग्रजी माध्यमाच्या शाळेत तो नववी इयत्तेत शिकत आहे. तीन महिन्यांपूर्वी मित्राकडून झालेल्या मारहाणीत तो जखमी झाला होता. त्यावेळी त्याच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती. ही जखम ताजी असतानाच गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास शाळेतील शिक्षक विश्वकर्मा याने वर्ग सुरू असताना तो अन्य मित्रांसोबत गप्पा मारत असल्यामुळे त्याला हटकले. तो ऐकत नसल्याने शिक्षा म्हणून त्याला काठीने मारायला सुरुवात केली. या अमानुष मारहाणीत तो जमिनीवर कोसळला. यामध्ये त्याच्या डोक्याला पुन्हा दुखापत झाली. याची माहिती शाळेतील अन्य शिक्षकांना समजताच त्याला सायन रुग्णालयात हलविण्यात आले.
याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी विद्यार्थ्याच्या तक्रारीवरुन शिक्षकाला अटक केली. विश्वकर्माने यापूर्वीही विद्यार्थ्यांना अशी मारहाण केली आहे का, या प्रकरणीही अधिक तपास सुरू आहे. विद्यार्थी थोडक्यात बचावला आहे. सध्या त्याच्या जिवाचा धोका टळला असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक व्यंकट पाटील यांनी दिली.