शिक्षकच खरे जीवनाचे शिल्पकार! - किशोरी पेडणेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 03:08 AM2020-09-05T03:08:53+5:302020-09-05T03:09:40+5:30

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या यशस्वी आयुष्याचे श्रेय हे शिक्षकांना देत त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे.

The teacher is the sculptor of real life! - Kishori Pednekar | शिक्षकच खरे जीवनाचे शिल्पकार! - किशोरी पेडणेकर

शिक्षकच खरे जीवनाचे शिल्पकार! - किशोरी पेडणेकर

googlenewsNext

मुंबई : विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यात मोठा हातभार असतो तो शिक्षकांचा. शिक्षक शालेय जीवनात बालमनावर योग्य संस्कार करतात, तेव्हाच पुढे विद्यार्थी एक आदर्श समाज निर्माण करतात. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या यशस्वी आयुष्याचे श्रेय हे शिक्षकांना देत त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे.

परब गुरुजींनी शिकविले आयुष्याचे गणित
शिकवणीसाठी घरी येणारे चंद्रकांत परब गुरुजी यांची शिस्त कडक. अवांतर पाठांतर, वाचन आणि लिखाणासाठी कठोर, शिस्तप्रिय, प्रसंगी चोप देणाऱ्या या गुरुजींमुळे शालेय जीवनात गणित, विज्ञान यांसारखे विषय पक्के झाले.
तर त्यांनी लावलेल्या शिस्तीमुळे आयुष्याचे गणित कधीच चुकले नाही.

लिखाणाचा दर्जा
नववी, दहावीत असताना मुख्याध्यापिका बदामी, सहस्रबुद्धे मॅडमने विशेष लक्ष दिले. सहस्रबुद्धे मॅडम यांनी शुद्धलेखन, व्याकरण पक्के करून घेतल्याने आज व्यावहारिक जीवनात भाषा सिद्धता योग्य झाली.

सभाधीटपणा आला तो केवळ शिक्षकांमुळेच
इयत्ता पाचवीत शिकत असताना मुख्याध्यापक जाधव गुरुजी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित भाषणे साभिनय सादर करून घेतली. त्या वयापासूनच वक्तृत्व कौशल्य गाजवत रंगमंचीय भीती मनातून निघून गेली. जाधव गुरुजी यांच्या या शिकवणीमुळे आज माझ्या राजकीय कारकिर्दीत मी माझे निर्णय आणि मते ठामपणे मांडू शकते.

बाळासाहेब ठाकरेंसारखे राजकीय शिक्षक लाभले
शालेय शिक्षणाबरोबर बालवयातच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे गारुड माझ्या मनावर होते. लहानपणी राजकारणातील काही कळत नव्हते, मात्र राजकारणाशी संबंध आल्यानंतर ‘राजकीय शिक्षक’ म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून धडे गिरवले. त्यांचा कणखर आणि करारी बाणा आत्मसाद करण्याचा प्रयत्न करून आज माझी राजकीय कारकिर्द यशस्वीपणे सुरू आहे.
त्यांचे मार्गदर्शन, शिस्त, प्रत्येक वेळी त्यांनी दाखवलेली प्रामाणिकपणाची, समाजसेवेची योग्य दिशा यामुळेच संकटावर मात करून निखळ यशाचे गणित सोडवणे माझ्यासाठी सोपे झाले.

शिक्षकांमुळेच भवितव्य घडते
लहान मुले ही मातीच्या गोळ्यासारखी असतात. त्यांना योग्य आकार देण्यासाठी आईवडिलांसह शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आयुष्य घडविणे, येणाºया सर्व संकटांवर जिद्दीने, त्यांच्या मार्गदर्शनाच्या आधारे मात करून भवितव्य घडविणे सोपे जाते. म्हणूनच शिक्षकांना मनापासून धन्यवाद!

 

Web Title: The teacher is the sculptor of real life! - Kishori Pednekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.