लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: तरुणाईमध्ये टॅटूचा ट्रेंड वाढत आहे. अनेकदा टॅटू काढताना आरोग्य, स्वच्छता या निकषांकडे दुर्लक्ष केले जाते. अस्वच्छ स्टुडिओ, जुन्याच सुया, निर्जंतुकीकरण न झालेली उपकरणे व अप्रशिक्षित टॅटू आर्टिस्ट आदींमुळे त्वचेचे, रक्ताद्वारे पसरणारे आजार होण्याची शक्यता असते.
टॅटू काढणाऱ्या कलाकाराला त्वचेची रचना, स्वच्छतेचे नियम आणि संसर्ग टाळण्याच्या पद्धती यांची माहिती असणे आवश्यक आहे. ते जर टायटॅनियम आणि ॲल्युमिनियम शाई आणि कोबाल्ट, क्रोमियम आणि आर्सेनिक वापरत असतील, तर टॅटू काढणे सहसा सुरक्षित असते.
टॅटू स्टुडिओची स्वच्छता ही संसर्ग टाळण्यासाठी पहिली पायरी आहे. जागा स्वच्छ नसेल, तर वातावरणातील जंतू (कृमी) उघड्या जखमेत प्रवेश करून रक्तात दोष निर्माण करू शकतात. टॅटूच्या शाईमध्ये असलेल्या धातूंची ॲलर्जी असल्यास ती टॅटूमुळे वाढू शकते. टॅटू काढण्यामुळे आरोग्याला होणाऱ्या धोक्यांमध्ये त्वचेची ॲलर्जी, संसर्ग आणि रक्तजन्य रोगांचा समावेश होतो. तसेच एचआयव्ही आणि हेपॅटायटीस बी या सारख्या आजारांचा टॅटुमुळे होणाऱ्या धोक्यांच्या यादीत समावेश होतो.
टॅटू काढल्यानंतर काय काळजी घ्यावी?
टॅटू काढल्यानंतर किमान ८ ते १० दिवस आहारात तिखट, तेलकट, मसालेदार आणि आंबट पदार्थ टाळा. जखम स्वच्छ आणि कोरडी ठेवा तसेच टॅटू काढल्यानंतर टॅटू आर्टिस्ट नेहमी टॅटूवर लावण्यासाठी कोणते तरी लोशन, क्रीम किंवा पेट्रोलिअम जेली लावण्याचा सल्ला देतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे टॅटूचा हानिकारक केमिकल्स आणि सूर्यापासून येणाऱ्या अल्ट्राव्हॉयलेट किरणांपासून नेहमीच बचाव करा.
डॉक्टरचा सल्ला घ्या
मधुमेही व्यक्तींना जखम भरण्याची नैसर्गिक क्षमता कमी झालेली असते. संसर्गाचा धोका त्यांना जास्त असतो. तसेच सोरायसिस, एक्झिमा यांसारखे त्वचाविकार असणाऱ्या व्यक्तींचा आजार टॅटूमुळे अधिक बळावू शकतो. अशा व्यक्तींनी टॅटू काढायचाच असेल, तर आधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे बंधनकारक आहे.
सुई आणि शाईची शहानिशा करा
टॅटू काढताना नवीन सुया वापरल्या जातील याची खात्री करा. आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे ना, कलाकार प्रशिक्षित आहे ना, याची खात्री करणे महत्त्वाचे आहे. शाईची गुणवत्ता तपासणे आणि एखाद्याला त्याची ॲलर्जी आहे की नाही, हे तपासणे महत्त्वाचे आहे. कोणतीही विशिष्ट खबरदारी नसतानाही, कोणतीही प्रतिकूल ॲलर्जी झाल्यास त्वरित त्वचारोग तज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे.