मुंबई : ‘टाटा पॉवर’ने ‘एमएमआर’सह राज्यातील काही प्रमुख भागांमध्ये वीज वितरणासाठी परवाना मिळवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे अर्ज दाखल केला आहे. या क्षेत्रामध्ये नवी मुंबई आणि पनवेल महापालिका, तसेच पनवेल ते जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणदरम्यानचा संपूर्ण कॉरिडॉर आणि पुणे शहरासह हवेली, मुळशी, मावळ व खेड तालुक्याचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे राज्यातील छत्रपती संभाजीनगर, बदनापूर, जालना तालुका, वाळूज एमआयडीसी, नाशिक, सिन्नर, इगतपुरी आणि त्र्यंबक तालुके या भागांतील वीज वितरणासाठी त्यांनी परवाना मागितला आहे. कंपनीकडून याबाबत नागरिकांकडून सूचना व हरकती मागवल्या आहेत.
दरम्यान, ‘टोरेन्ट’ आणि अदानी पॉवर कंपन्यांसाठीही अशीच प्रक्रिया सुरू असून, २२ जुलै रोजी वीज नियामक आयोगाकडून त्यांच्या अर्जांवर सुनावणी घेण्यात येणार आहे. यामुळे ग्राहकांसाठी नव्या पर्यायांची संधी निर्माण होईल.