मुंबई - बॉडी बिल्ड करण्यासाठी स्टिरॉईड घेणं एका तरूणासाठी जीवघेणं ठरलं आहे. स्टिरॉईडचं अतिसेवन केल्याने नावेद जमील खान (२३) या तरूणाचं मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत नावेद मुंब्रा येथील असरफ कंपाउंडमध्ये राहत होता. ठाण्यात होणाऱ्या शरीरसौष्ठव स्पर्धेत तो सहभागी होणार होता. त्याच दिवशी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. उपचारासाठी त्याला केईएम रुग्णालयात आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते.नावेदला शुक्रवारी रात्री ताप आल्याने कुटुंबियांनी त्याला स्थानिक डॉक्टरांकडे उपचारासाठी नेले. डॉक्टरांनी काही चाचण्या केल्यानंतर त्याला बिलाल रुग्णालयात नेण्यास सांगितले. बिलाल रुग्णालयात काही चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांमधून नावेदला हिपॅटायटीस - बी (Hepatitis - B) हा आजार झाल्याचं निष्पन्न आलं. त्याच्या शरीरामधील कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही अधिक असल्याचं वैद्यकीय तपासात उघड झालं. व्यायाम करण्याची क्षमता वाढवण्यासाठी घेण्यात येणाऱ्या औषधांमधील स्टिरॉइड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्लुकोकॉट्रीकॉइड्स यामुळे शरिरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्याचे डॉक्टरांनी माहिती दिली.