खाेकल्यावर कफ सीरप घेताय? मग जाणून घ्या या गोष्टी...; डॉक्टरांचा सल्ला न घेता औषध वापरणे धोकादायक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 09:39 IST2025-10-07T09:39:42+5:302025-10-07T09:39:50+5:30
मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये ‘कोल्डरिफ सिरप’मुळे काही बालकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनने तातडीने जनतेसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.

खाेकल्यावर कफ सीरप घेताय? मग जाणून घ्या या गोष्टी...; डॉक्टरांचा सल्ला न घेता औषध वापरणे धोकादायक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अलीकडे काही राज्यांमध्ये कफ सिरपमुळे बालकांचे मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर कफ सिरप घेताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये ‘कोल्डरिफ सिरप’मुळे काही बालकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनने तातडीने जनतेसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. या औषधाच्या प्रयोगशाळेतील चाचणीत औद्योगिक विषारी रसायनाचे अंश आढळले आहेत. हे रसायन अँटीफ्रिझसारख्या उत्पादनांमध्ये वापरले जाते. त्याचे सेवन केल्यास मूत्रपिंड निकामी होण्याची दाट शक्यता असते.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध देऊ नका
कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये, विशेषतः लहान मुलांसाठी. दोन वर्षांखालील बालकांना खोकल्याची औषधे देणे टाळावे, अशी शिफारस केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली आहे.
औषध खरेदी करताना त्याचा बॅच नंबर, उत्पादन दिनांक, मुदत संपण्याची तारीख आणि उत्पादन करणारी कंपनी यांची खातरजमा करावी. बॅन झालेल्या किंवा संशयित औषधांचे सेवन अजिबात करू नये.
खोकला झाला म्हणून उठसूट कफ सीरप घेणे चुकीचे आहे. अनेक वेळा खोकला आला म्हणून नागरिक मेडिकलमध्ये जाऊन स्वतःच्या मनाने औषध घेतात. हे धोकादायक आहे त्यामुळे काही वेळा गुंतागुंत निर्माण होऊ शकते. खोकला येण्याचे कारण शोधून त्यावर उपचार करावा. निदानाप्रमाणे औषध दिल्यास खोकला आपोआप बरा होतो. टीबी, फुप्फुसाचा संसर्ग आणि अस्थमामुळे होणाऱ्या खोकल्यासाठी वेगळी औषधे दिली जातात. त्यामध्ये सरसकट कफ सीरप देत नाहीत. त्यामुळे खोकल्यावर उपचार करणे गरजेचे आहे.
- डॉ. समीर गर्दे, श्वसनविकार तज्ज्ञ
कुठून खरेदी कराल औषधे?
कफ सीरपमध्ये काही वेळा डायइथिलीन ग्लायकोल किंवा इथिलीन ग्लायकोलसारखे विषारी घटक मिसळले जातात. हे आरोग्यास अपायकारक ठरतात. त्यामुळे अधिकृत आणि विश्वासार्ह औषध विक्रेत्यांकडूनच औषधे खरेदी करावीत. औषध घेतल्यानंतर कोणतीही ॲलर्जी, उलटी, चक्कर, श्वास घेण्यास अडचण यासारखी लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.