Join us

संसदेच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विषय घ्या; विद्याताई चव्हाणांची केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 22:01 IST

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलने उपोषणे सुरू आहेत.

मुंबई - राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलने उपोषणे सुरू आहेत. या संदर्भात आता राष्ट्रवादीच्या नेत्या विद्याताई चव्हाण यांनी राज्य सरकारकडे मागणी केली आहे. राज्य सरकारने केंद्राकडे मागणी करून 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या विशेष अधिवेशनात  50% ची मर्यादा वाढवून द्यावी जेणेकरून मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा होईल. देशातील इतर 8 राज्यांमध्ये देखील 50% अट ही सुप्रीम कोर्टाने (इंदिरा  सहानी) काढून दिलेल्या अटीमुळे आरक्षण देण्यास अडथळा येत आहे. मोदी है तो मुमकिन है म्हणणाऱ्या भाजपला आम्हाला सांगायचं आहे की तुम्ही आता हे संसदेत करून घेणार का? असा प्रश्न देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या  विद्याताई चव्हाण यांनी केला आहे.

भारतात पोहचताच ब्रिटनचे पंतप्रधान म्हणाले, "मी हिंदू असल्याचा मला अभिमान वाटतो"

भाजप फक्त मताच्या राजकारणाकरिता जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत असते. भाजप नेत्यांना जर मराठा समाजाला खरंच आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी संसदेचे होणारे विशेष अधिवेशनात हा मुद्दा मार्गी लावावा. ओबीसी, मराठा असं भांडण लावण्याचं काम सरकार आरक्षणाच्या माध्यमातून करत आहे.धनगरा चे आरक्षण हे केंद्रामध्ये "धनगड"हे म्हटल्यामुळे  थांबलेले आहे. त्यासाठी सुधारणा करून घेण्याचे काम या विशेष अधिवेशनात करून घेण्याचे आवश्यक आहे. आरक्षणाचा मुद्दा धरून भाजप केवळ राजकारण करू पाहत आहे असेही विद्याताई चव्हाण यांनी बोलताना म्हटले आहे. 

विद्याताई चव्हाण म्हणाल्या की, आझाद मैदानात सुद्धा लोक उपोषणाला बसलेले आहेत. तिथे उपोषणाला बसलेल्या आंदोलकांना ४ दिवसात सरकारने भेट सुद्धा दिलेली नाही. आझाद मैदान ते मंत्रालय हे हाकेच्या अंतरावर आहे. मात्र कोणीही साधी दखल सुद्धा घेत नाही  तरुण मंडळींचे उपोषण सरकारने सोडवण हे गरजेचं आहे. पण राज्य सरकारला सर्वसामान्य जनतेचे काहीही देणंघेणं नाही आहे. सरकार केवळ समाजा समाजात जातीय तेढ निर्माण करत आहेत  असे विद्याताई चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसमराठा आरक्षण