Survey of 9 lakh citizens so far in the wake of Corona; 2455 teams working | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ९ लाख नागरिकांचे सर्वेक्षण; २४५५ पथके कार्यरत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ९ लाख नागरिकांचे सर्वेक्षण; २४५५ पथके कार्यरत

मुंबई : कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्याच्या आरोग्य विभागाने ‘क्लस्टर कंटेनमेंट कृती योजना’ राबवली आहे. ज्या भागात कोरोना रूग्णांचे क्लस्टर सापडले तिथे घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे काम केले जात आहे. त्यासाठी राज्यातील १८ जिल्ह्यात एकूण २४५५ पथके तयार करण्यात आली आहेत. आतापर्यंत ९ लाख २५ हजार ८२८ नागरिकांचे या माध्यमातून सर्वेक्षण झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी दिली.

कंटेनमेंट कृती आराखड्यानुसार ज्या भागात कोरोनाचे तीन किंवा त्यापेक्षा जास्त पॉझीटिव्ह रुग्ण आढळून आले. तेथे कृती आराखड्यानुसार कारवाई अपेक्षित आहे. मात्र, खबरदारी म्हणून सध्या एक रुग्ण जरी आढळून आला, तरीही सर्वेक्षणाचे काम केले जात असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. त्यानुसार बाधीत रुग्ण ज्या भागात राहतो तेथून साधारणपणे तीन किलोमीटरपर्यंतच्या भागाचे सर्वेक्षण केले जाते. त्यासाठी तैनात पथकांद्वारे घरोघर जावून सर्वेक्षण केले जाते.

कंटेनमेंट झोन निश्चित झाल्यानंतर त्या भागाचा नकाशा तयार केला जातो. घरांची संख्या आणि लोकसंख्या विचारात घेऊन पथके तयार केली जातात. सकाळी आठ ते सायंकाळी चार या वेळात पथकातील सदस्य घरोघरी जाऊन नागरिकांना सर्दी, ताप खोकला, श्वास घेताना होणारा त्रास आदींबाबत माहिती जमा करतात. लक्षणांनुसार रुग्णांची यादी तयार केली जाते. ती संबंधित आरोग्य अधिकाऱ्याला दिली जाते. ज्या पथकाला जो विभाग नेमून दिला आहे, त्याच पथकाने पुढील १४ दिवस दररोज सर्वेक्षण करायचे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

संशयित रुग्ण आढळल्यास संबंधित आरोग्य अधिकारी मोठ्या रुग्णालयाकडे त्याला पाठवतो, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. या पथकामध्ये आरोग्य कर्मचारी, एएनएम, हिवताप निर्मूलन कर्मचारी, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आवश्यकता भासल्यास नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी यांचा समावेश केला जातो.

पथकांचा तपशील

पुणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक ४१३ पथके, त्या पाठोपाठ मुंबई महापालिका क्षेत्रात २९२, नागपूर महापालिका क्षेत्रात २१० पथके कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत घरोघरी जाउन सर्वेक्षण केले जाते. राज्यात १८ जिल्ह्यांमध्ये एकूण २,४५५ पथके सर्वेक्षणाचे काम करीत आहेत. मुंबई, पुणे आणि नागपूरसह पिंपरी चिंचवड महापालिका (३८), पुणे ग्रामीण भाग (३३१), ठाणे जिल्ह्यातील ठाणे महापालिका(१४०), कल्याण डोंबिवली महापालिका (८२), नवी मुंबई महापालिका (१६९), उल्हासनगर (९०), रायगड जिल्ह्यातील पनवेल महापालिका (६५), रत्नागिरी (५४), अहमदनगर जिल्हा (१५) व , यवतमाळ (५२), नागपूर (२१०) क्षेत्रात सध्या ही सर्वेक्षण पथके कार्यरत आहेत.

Web Title: Survey of 9 lakh citizens so far in the wake of Corona; 2455 teams working

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.