आश्चर्य ! साडेतीन वर्षांतच मेट्रो डबे गंजले, एमएमआरडीएच्या गाड्यांच्या देखभाल-दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह, करोडोंचा खर्च वाया जाण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 08:25 IST2025-11-11T08:25:15+5:302025-11-11T08:25:43+5:30
Mumbai Metro News: डी. एन. नगर ते दहिसर पूर्व ‘मेट्रो २ अ’ आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या ‘मेट्रो ७’ मार्गिकेवर कोट्यवधी रुपये खर्चून खरेदी करण्यात आलेले गाडीचे डबे मेट्रोचे लोकार्पण होऊन साडेतीन वर्षे उलटत नाहीत तोच गंजल्याचे समोर आले आहे.

आश्चर्य ! साडेतीन वर्षांतच मेट्रो डबे गंजले, एमएमआरडीएच्या गाड्यांच्या देखभाल-दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह, करोडोंचा खर्च वाया जाण्याची भीती
मुंबई - डी. एन. नगर ते दहिसर पूर्व ‘मेट्रो २ अ’ आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या ‘मेट्रो ७’ मार्गिकेवर कोट्यवधी रुपये खर्चून खरेदी करण्यात आलेले गाडीचे डबे मेट्रोचे लोकार्पण होऊन साडेतीन वर्षे उलटत नाहीत तोच गंजल्याचे समोर आले आहे. गाडीच्या डब्यांच्या वरच्या भागाला गंज चढू लागला असून आता या डब्यांची देखभाल होते की नाही, असा प्रश्न विचारला जात आहे. हीच स्थिती राहिल्यास भविष्यात मेट्रोचे डबे लवकर खराब होऊन त्यासाठी केलेला खर्चही वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकेचा पहिला टप्पा एप्रिल २०२२ मध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला. या मेट्रो मार्गिकेवरून सद्य:स्थितीत २४ गाड्यांच्या माध्यमातून सेवा दिली जात असून जवळपास ३०५ फेऱ्या होत आहेत. पर्यावरणवादी कार्यकर्ते झोरू बथेना यांनी समाजमाध्यमातून डब्यांना गंज लागलेली छायाचित्रे प्रसारित केली आहेत. त्यामध्ये मेट्रो २ अ मार्गिकेवरील एम २ डी ०२७ डबा असलेल्या एका गाडीतील काही डब्यांवर गंज लागल्याचे आढळून आले आहे.
अंधेरी पश्चिम ते डहाणूकरवाडी असा प्रवास सायंकाळी ४:२० वाजण्याच्या सुमारास करत होतो. यावेळी या मेट्रोच्या डब्यांवरील भागात गंज लागल्याचे दिसले. हे डबे याहून अधिक खराब होऊ नयेत यासाठी तत्काळ गंजरोधक काम करण्याची गरज आहे, अशी मागणी झोरू बथेना यांनी केली.
पाहणीचा अहवाल घेणार
मेट्रो गाड्यांची देखभाल आणि दुरुस्ती करणाऱ्या पथकाला डब्यांची पाहणी करण्यास सांगितले असून दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून उद्या अहवाल घेतला जाणार आहे. अहवालानंतर पुढील निर्णय घेऊ, अशी माहिती महामुंबई मेट्रो संचलन मंडळाच्या (एमएमएमओसीएल) व्यवस्थापकीय संचालिका रुबल अगरवाल यांनी दिली.
पावसाळ्यात गळती होण्याचा धोका
सद्य:स्थितीत सहा डब्यांच्या मेट्रो गाडीच्या यंत्रणेसह खरेदीसाठी तब्बल १०० कोटी रुपयांहून अधिकचा खर्च येतो. या गाड्यांची निगा योग्यरीतीने न राखल्यास डब्यांचे छत कुमकुवत होऊन पावसाळ्यात गळती होऊ शकते.