Join us

सुप्रिया सुळे म्हणालेल्या वकिलाचा करेक्ट कार्यक्रम होणार तो हाच...' ; गुणरत्न सदावर्तेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 08:32 IST

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची काल सकाळी मराठा आंदोलकांनी तोडफोड केली.

मुंबई- वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची काल सकाळी मराठा आंदोलकांनी तोडफोड केली. या संदर्भात तिघांवर गुन्हेही दाखल झाले. यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अटकेची मागणी केली. काल त्यांनी पोलीस आयुक्तांचीही भेट घेतली, यानंतर सदावर्ते यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना थेट सवाल केला.

गुणरत्न सदावर्ते यांच्या घराखाली लावलेली कार सरपंचाने फोडली; तिघांना अटक, एक जण पसार

वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले, तोडफोडीमागे कोणतर असणार आहे, हे सर्व नियोजनबद्ध असू शकते. राणे साहेबांनी सांगितलं गुन्हेगारांचे लोकेशन तपासले पाहिजेत. आम्ही घाबरलेलो नाही, चिल्लर लोकांकडे लक्ष देणार नाही. आम्ही पोलिसांची भेट घेतली आहे. अधिकाऱ्यांनी तांत्रिक अहवाल मागवला आहे. पोलिसांनीही चिंता व्यक्त केली आहे. आम्ही आरक्षणाचे गलिच्छ राजकारण करणार नाही. आम्ही आरक्षण विरोधी कमिटी स्थापन केली आहे, असंही गुणरत्न सदावर्ते म्हणाले. 

" ज्या आरोपींनी कोणाच तरी ऐकून गाड्या फोडल्या आहेत. मला परत सुप्रिया ताईंना विचारायचं आहे, बघा वकिलांचा करेक्ट कार्यक्रम करते असं त्या म्हणाल्या होत्या तो करेक्ट कार्यक्रम हाच आहे का? असा सवालही गुणरत्न सदावर्ते यांनी केला. 

गुणरत्न सदावर्ते यांच्या घराखाली लावलेली कार सरपंचाने फोडली

‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देत  मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या कारची गुरुवारी तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले, तर रेकॉर्डिंग करणारी व्यक्ती पसार झाली असून भोईवाडा पोलिस अधिक तपास करत आहेत. अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी मंगेश साबळे (२५) हे सरपंच आहेत. 

क्रिस्टल टॉवरमध्ये सदावर्ते राहतात. वाहन रस्त्याकडेला पार्क करतात. गुरुवारी सकाळी एका कारमधून आलेल्या तिघांनी घोषणा देत  सदावर्ते यांच्या कारची तोडफोड केली, तसेच एकाने त्याचे चित्रीकरणही केले. त्यानंतर व्हिडीओ करणारी व्यक्ती पसार झाली.

पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील मंगेश साबळे (२५), वसंत शामराव बनसोडे (३२) आणि राजू साठे (३२) या तिघांना ताब्यात घेतले. तिघांनाही भोईवाडा पोलिस ठाण्यात आणले. तिघांविरुद्ध गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचून, हत्यारबंदी कायद्याचे उल्लंघन, सार्वजनिक शांततेचा भंग आणि तोडफोडप्रकरणी गुन्हा नोंदवत अटकेची कारवाई केली आहे.

टॅग्स :गुणरत्न सदावर्तेसुप्रिया सुळेराष्ट्रवादी काँग्रेस