Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे समर्थक ३९ आमदारांना सुप्रीम कोर्टाच्या नोटिसा; दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 07:42 IST

आमदार अपात्रताप्रकरणी नार्वेकर यांनी १० जानेवारी रोजी दिलेल्या निकालाला ठाकरे गटाने १५ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

मुंबई/नवी दिल्ली : शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या ठाकरे गटाच्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ३९ समर्थक आमदारांना नोटिसा जारी केल्या असून, दोन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या पीठापुढे ठाकरे गटाने केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. आमदार अपात्रताप्रकरणी नार्वेकर यांनी १० जानेवारी रोजी दिलेल्या निकालाला ठाकरे गटाने १५ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

भरत गोगावले यांनी एकनाथ शिंदे यांच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेवरील मुंबई उच्च न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी ८ फेब्रुवारीची तारीख दिली आहे. त्यामुळे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सिब्बल यांना उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. पण, उच्च न्यायालयात गेल्यामुळे कालापव्यय होणार असल्याने सर्वोच्च न्यायालयानेच शिंदे समर्थक ३९ आमदारांना नोटिसा जारी कराव्यात, अशी मागणी सिब्बल यांनी केली. त्यानुसार या आमदारांना नोटिसा बजावून दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.

वेळेचा अभाव असल्यामुळे शिंदे समर्थक आमदारांच्या पत्त्यांवर नोटिसा पाठवण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे. ठाकरे गटाच्या वतीने सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्षांच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या ३९ आमदारांना प्रतिवादी केले आहे, तर गोगावले यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत ठाकरे गटाचे १४ आमदार आणि विधानसभा अध्यक्षांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

टॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरेशिवसेना