आरे मेट्रो कारशेडचे मुख्यमंत्र्यांकडून समर्थन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 06:49 IST2019-09-24T03:59:58+5:302019-09-24T06:49:36+5:30
...तर मेट्रो आर्थिकदृष्ट्या व्यवहार्यच होणार नाही; अन्यत्र जागा घ्यायची तर पाच हजार कोटींचा बोजा

आरे मेट्रो कारशेडचे मुख्यमंत्र्यांकडून समर्थन
मुंबई : मेट्रो कारशेडचे काम आरे कॉलनीत न करता अन्यत्र जागा शोधून केले, तर प्रकल्पाची किंमत पाच हजार कोटी रुपयांनी वाढेल आणि प्रकल्प तर व्यवहार्य राहणार नाहीच, शिवाय मेट्रोचे भाडे वाढवावे लागेल व त्याचा बोजा सर्वसामान्य मुंबईकरांवर पडेल, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी आरे मेट्रो कारशेडचे जोरदार समर्थन केले.
पत्रकार परिषदेत याबाबत विचारले असता ते म्हणाले की, एक झाड तोडणेही योग्य नाही, पण प्रकल्पही महत्त्वाचा आहे. जिथे झाडे कापली जात आहेत, ते जंगल नाही, यावर सर्वोच्च न्यायालयापर्यंत शिक्कामोर्तब झालेले आहे. पर्यावरणाचा विचार करत पर्यावरणदृष्ट्या संवेदनशीलदेखील नाही. आज मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागेचा विचार केल्यास प्रकल्पच व्यवहार्य ठरणार नाही. जी पर्यायी जागा सुचविली जात आहे, ती खासगी आहे आणि ती संपादित करायची, तर हजारो कोटी रुपये खर्च येईल. आरेतील जमीन ही शासनाच्या मालकीची आहे. कारशेडसाठी झाडे तोडावी लागणार, याचे दु:ख मलाही आहे. २,७०० झाडे तोडली जाणार आहेत, पण त्यातील ५०० झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार असून, इतर झाडे अन्यत्र लावली जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
१० हजार हरकती एकाच आयपी अॅड्रेसवरून
आरे मेट्रो शेडला विरोध करणारे काही पर्यावरणवादी प्रामाणिक आहेत, पण या कारशेडबाबत हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. १३ हजार हरकती आल्या, त्यातील १० हजार हरकती बंगळुरूतील एकाच आयपी अॅड्रेसवरून आलेल्या आहेत. त्यामुळे शंका येते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.