मुंबईकरांसाठी रविवार ठरला ‘उष्ण’वार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 04:32 AM2018-10-29T04:32:39+5:302018-10-29T04:33:04+5:30

उन्हाचा तडाखा वाढला; सांताक्रुझमध्ये ३८ तर कुलाब्यात ३७ अंशांची नोंद

Sunday for Mumbai's 'heat' | मुंबईकरांसाठी रविवार ठरला ‘उष्ण’वार

मुंबईकरांसाठी रविवार ठरला ‘उष्ण’वार

Next

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगराचा पारा दिवसागणिक वाढतच असून, रविवारी तर कमाल तापमानाने कहर केला आहे. सांताक्रुझ आणि कुलाबा वेधशाळा येथे अनुक्रमे ३८, ३७ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. महत्त्वाचे म्हणजे, ऐन रजेच्या दिवशी दिवाळीच्या खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना ‘ताप’दायक उन्हाचा चांगलाच तडाखा वाढला असून, उत्तरोत्तर यात आणखी वाढ नोंदविण्यात येणार आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. गोव्यासह संपूर्ण राज्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. कोकण, गोवा व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. २८ आॅक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. २९ ते ३० आॅक्टोबर रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३६, २१ अंशाच्या आसपास राहील, असे हवामान शास्त्र विभागाकडून सांगण्यात आले.

मुंबईकर विषम वातावरणाला सामोरे
गेल्या आठवड्यात मुंबई शहर आणि उपनगरातील ठिकठिकाणच्या किमान तापमानात घट नोंदविण्यात आली होती. महत्त्वाचे म्हणजे, कमाल आणि किमान तापमानातील फरक तब्बल पंधरा अंशाचा होता. मागील दोन दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा वरचढ ठरत असून, रविवारी कमाल तापमान थेट ३८ अंश नोंदविण्यात आले आहे. दरम्यान, दुसरीकडे दिवसभर तापदायक ऊन सहन केल्यानंतर रात्री किंचित गारवा पडत असल्याने, मुंबईकर सध्या विषम वातावरणाला सामोरे जात आहेत.

Web Title: Sunday for Mumbai's 'heat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.