Join us  

मुंबईला ऊन्हाचा तडाखा; ६ सप्टेंबरनंतर मान्सूनचे कम बॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2020 5:59 PM

कुलाबा ३२.६ तर सांताक्रूझ ३३.८

मुंबई : मुंबईसह राज्यभरात मान्सूनने विश्रांती घेतली असली तरीदेखील ६ सप्टेंबरदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मान्सूनचा जोर पुन्हा वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दुसरीकडे मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असतानाच शुक्रवारी मुंबईला ब-यापैकी ऊन्हाचा तडाखा बसल्याचे चित्र होते.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात ब-याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. ५ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. ६ सप्टेंबर रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. ७ सप्टेंबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. ८ सप्टेंबर रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. ५ आणि ६ सप्टेंबर रोजी मुंबई शहर आणि उपनगरात सायंकाळी, रात्री आकाश अंशत: ढगाळ राहील. हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल, अशीही शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.  

टॅग्स :पाऊसमुंबई मान्सून अपडेटहवामान