‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 10:50 IST2025-08-23T10:49:41+5:302025-08-23T10:50:01+5:30
बेस्ट एम्प्लॉइज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.ची पंचवार्षिक निवडणूक सोमवारी पार पडली

‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: नुकत्याच झालेल्या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि मनसे यांच्या उत्कर्ष पॅनलला एका ही जागा निवडून आणता आली नाही. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपला राजीनामा आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला असून, पुढील निर्णय वरिष्ठांचा असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
बेस्ट एम्प्लॉइज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.ची पंचवार्षिक निवडणूक सोमवारी पार पडली. ही निवडणूक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे समर्थक पॅनल एकत्र लढले. मराठीच्या मुद्द्यावर हे दोन्ही बंधू एकत्र आल्यावर ही पहिलीच निवडणूक. शिवसेनेच्या (ठाकरे) कामगार सेनेचे जास्तीत जास्त सदस्य हे या पतपेढीचे सभासद आहेत. त्यामुळे ते यश मिळवतील, असे मानले जात होते. मात्र, शशांक राव यांच्या बेस्ट वर्कर्स युनियनने अचानक मुसंडी मारत १४ जागा मिळवल्या. त्यामुळे कामगार सेनेला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीतील पराभवामुळे कामगार सेनेच्या कार्यपद्धतीवर ही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
यामुळे गमावली निवडणूक
वर्षानुवर्षे रखडलेली देणी, उपक्रमाच्या नेतृत्त्वात वर्षानुवर्षे न झालेला बदल, कर्मचाऱ्यांची नाराजी यामुळे बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत उत्कर्ष पॅनलला हार पत्करावी लागली, अशी चर्चा आहे. त्यातच उद्धव ठाकरेंकडून संघटनेच्या नेतृत्त्वात बदलाचेही सूतोवाच केले होते. त्यामुळे सामंतांच्या राजीनाम्यावर पक्ष नेतृत्त्व काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.