Join us

शिखर बँक घोटाळाः कर नाही त्याला डर कशाला, सुधीर मुनगंटीवारांचा अजित पवारांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 21:23 IST

'ईडीशी राज्याचा दुरान्वयेही संबंध येत नाही'

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेक नेत्यांवर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी ईडीचा आणि राज्याचा दुरान्वयेही संबंध येत नसल्याचे सांगत कर नाही त्याला डर कशाला, असे म्हणत एकप्रकारे अजित पवार यांना टोला लगावला आहे. 

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, "कायदा आपलं काम करतो. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच बॅंकेच्या संदर्भातील चौकशी लावली होती. त्यावेळी स्वत: अजित पवार सरकारमध्ये सहभागी होते. त्यांच्याच सरकारने लावलेल्या वेगवेगळ्या चौकशीच्या निष्कर्षावर कार्टाने बँकेच्या संदर्भामध्ये काही नोंदी घेतल्या. त्या आधारावर एफआयआर दाखल करत पुढे चौकशी झाली पाहिजे, असे सांगितले. ईडी, सीबीआय किंवा न्यायव्यवस्था असेल, या आपापल्या स्तरावरून घटनेच्या चौकटीमध्ये राहून काम करतात. राजकारण राजकरणाच्या जागी असते. पण, चूक केली तर त्या चूकीच्या संदर्भात कोणीही नेता छोटा नाही किंवा मोठा नाही. कितीही मोठा नेता असला तरी केस होऊ शकते."

याचबरोबर, ईडी हा राज्य सरकारचा भाग नाही. ईडी हा केंद्र सरकारशी संबंधीत आहे. ईडीशी राज्याचा दुरान्वयेही संबंध येत नाही. जशा सूर्य चंद्राचा संबंध येत नाही, तसा ईडी आणि राज्याचा संबंध येऊ शकत नाही. ईडी ही केंद्राच्या अत्यारित आहे. ईडीच्या चौकशीमध्ये कुणाचे नाव आहे, कोणाचे नाही, हे तर सांगता येणार नाही. फक्त मी एवढेच सांगू शकतो. कर नाही, त्याला डर नाही, असे सुधीर मुनगंटीवर यांनी सांगितले आहे. 

महाराष्ट्र राज्य सहकारी  बँकेतील 25 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून एमआरए पोलीस ठाण्यात हायकोर्टाच्या आदेशानुसार अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांवर काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आता अंमलबजावणी संचालनालय (ईडी) देखील तपासाचा फास आवळत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवारांसह ७० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, ईडीच्या या कारवाईमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापणार असल्याची चिन्ह दिसत आहेत.  

टॅग्स :सुधीर मुनगंटीवारअजित पवारबँकअंमलबजावणी संचालनालय