Join us
Daily Top 2Weekly Top 5

Anil Deshmukh Arrest: “सचिन वाझे ताब्यात आल्यावरच अनिल देशमुखांनी ‘ईडी’समोर जाण्याचा मुहूर्त का काढला?”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 17:25 IST

Anil Deshmukh Arrest: गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले अनिल देशमुख सोमवारी सकाळी सर्वांसमोर आल्याचे पाहायला मिळाले.

मुंबई: १०० कोटींच्या वसुली प्रकरणी आरोप असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh Arrest) यांना तब्बल १३ तासांच्या दीर्घ चौकशीनंतर सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) सोमवारी रात्री उशिरा अखेर अटक करण्यात आली. यानंतर राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील नेत्यांनी भाजप आणि तपास यंत्रणांवर टीका केली असून, भाजपही याला प्रत्युत्तर देत आहे. यातच आता राज्याचे माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया दिली असून, सचिन वाझे हे महाराष्ट्र पोलीस आणि एसआईटी च्या ताब्यात आल्यावरच अनिल देशमुखांनी ईडी च्या समोर जाण्याचा मुहूर्त का काढला, असा थेट सवाल केला आहे. 

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला असून, अनिल देशमुख यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. खरं आहे देर आए दुरूस्त आए. एक गृहमंत्री म्हणून ज्यांनी जबाबदारीचा निर्वाह केला, त्यांनी एक आदर्श प्रस्थापित करायला हवा होता. अनिल देशमुख नेहमी पोलीस अधिकाऱ्यांसोबत किंवा जनतेसोबत संवाद साधताना सागंयाचे की, पोलिसांनी एखादा खोटा गुन्हा दाखल केला तर त्यासंदर्भात आपली बाजू मांडली पाहिजे. कायदा तुमच्या बाजूने उभा आहे. मग जे वाक्य अनिल देशमुख दुसऱ्यांना सांगायचे, त्यांनाच असे अचानक काय झाले, अशी विचारणा सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.  

इतके दिवस कुठे होते, याचे उत्तर देशमुखांनी दिले पाहिजे

ज्या मुद्द्यासंदर्भात लक्ष वेधू इच्छितो की सचिन वाझे आता महाराष्ट्राच्या एसआयटीच्या सुपूर्द झाला आहे. कदाचित अनिल देशमुखांना असे वाटत असेल, आता सचिन वाझे आपण सांगू त्या पद्धतीने एसआयटी त्याच्याकडून कबूल करून घेईल आणि म्हणून आता जर ईडीच्या समोर गेलो तर आता धोका नाही. हे असण्याची शक्यता आहे. असा मुहूर्त का काढला? सचिन वाझे महाराष्ट्र पोलीस व एसआयटीच्या ताब्यात आल्याबरोबर अनिल देशमुख हे ईडीच्या समोर आले. इतक्या दिवस कुठे होते? याचे उत्तर शेवटी अनिल देशमुख यांनी दिले पाहिजे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले अनिल देशमुख सोमवारी सकाळी सर्वांसमोर आल्याचे पाहायला मिळाले. सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाकडून अनिल देशमुख यांना कोणताही दिलासा न मिळाल्याने ते ED समोर दुपारी सुमारे ११.३० वाजता अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले. अनिल देशमुख यांची मुंबईतील कार्यालयात चौकशी सुरू असताना दिल्लीतून काही अधिकारी सायंकाळी ७.३० सुमारास मुंबईत दाखल झाले आणि ते थेट ईडीच्या कार्यालयात गेले. रात्री उशिरापर्यंत चौकशी केल्यानंतर अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली.  

टॅग्स :अनिल देशमुखसचिन वाझेसुधीर मुनगंटीवारअंमलबजावणी संचालनालय