...अशाही घटना घडतात, मुलांवर लक्ष ठेवा; तुमचे मूल लिफ्टमधून एकटे ये-जा करतेय का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 07:05 IST2020-11-30T04:20:14+5:302020-11-30T07:05:37+5:30
शाहूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी, रहिवाशी, पालक तसेच हद्दीमधील लिफ्ट असलेल्या इतर रहिवाशांनी आपल्या मुलांना लिफ्टमधून एकटे सोडू नये. तसेच लिफ्टमनशिवाय लिफ्टमध्ये प्रवेश देऊ नका, असे आवाहन केले आहे.

...अशाही घटना घडतात, मुलांवर लक्ष ठेवा; तुमचे मूल लिफ्टमधून एकटे ये-जा करतेय का?
मुंबई : धारावीत ५ वर्षीय चिमुरड्याचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाल्याच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला. त्यामुळे पालकांनी आपले मूल काय करते, याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. पोलिसांनीही पालकांनी मुलांना एकटे लिफ्टमधून ये-जा करु देऊ नये तसेच मुलांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
धारावीत राहणारा ५ वर्षीय मोहम्मद हुजेईफा सर्फराज शेख खेळता खेळता बहीणभावासोबत लिफ्टने चौथ्या मजल्यावर गेला. अशात दोन्ही बहिणी लिफ्टने बाहेर पडताच, शेख हा स्लायडिंग दरवाजा लावत असताना सेफ्टी दरवाजा बंद झाला आणि यातच लिफ्ट चालू होत वर गेल्याने तो लिफ्टमध्ये चिरडला गेला.
या घटनेनंतर शाहूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी, रहिवाशी, पालक तसेच हद्दीमधील लिफ्ट असलेल्या इतर रहिवाशांनी आपल्या मुलांना लिफ्टमधून एकटे सोडू नये. तसेच लिफ्टमनशिवाय लिफ्टमध्ये प्रवेश देऊ नका, असे आवाहन केले आहे.
आपले मूल काय करते याकडे पालकांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यांच्याकडे थोडेसे दुर्लक्ष महागात पडू शकते. यापूर्वीही अशा वेगवेगळ्या घटनांमध्ये चिमुकल्यांना जीव गमवावा लागला होता. यापूर्वी खेळता खेळता झोपाळ्याचा गळफास बसल्याने मुलाचा मृत्यू झाला होता.
अशाही घटना घडतात, मुलांवर लक्ष ठेवा
मित्र-मैत्रिणीसोबत मौजमजा, पार्टी करण्यासाठी १७ वर्षीय सीएचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याने थेट कॉफी शॉपचा सर्व्हर हक केला. मुंबई सायबर पोलिसांनी त्याला अटक केली. यात युट्यूबवरून त्याने याचे प्रशिक्षण घेतले आहे. तर लहान बहिणीवर जास्त प्रेम करतात म्हणून अधिकाऱ्याच्या ६ वर्षांच्या मुलीने थेट वडिलांनाच धमकीचे ईमेल धाडल्याचा प्रकारही समोर आला होता. त्यामुळे मुलांच्या सोशल मीडियावरील हालचालींवरही लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे सायबर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.