मुंबईत तीन वर्षांत ३४ हजार जणांवर यशस्वी नसबंदी शस्त्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 12:31 IST2025-07-22T12:31:10+5:302025-07-22T12:31:26+5:30
२०२२-२३ ते २०२४-२५ अशा तीन वर्षांमध्ये एकूण ३४ हजार ८०५ नसबंदीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत.

मुंबईत तीन वर्षांत ३४ हजार जणांवर यशस्वी नसबंदी शस्त्रक्रिया
मुंबई : केंद्र शासनाच्या कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून २०२२-२३ ते २०२४-२५ अशा तीन वर्षांमध्ये एकूण ३४ हजार ८०५ नसबंदीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत.
महापालिकेची प्रमुख रुग्णालये, सर्वसाधारण रुग्णालये, प्रसूतीगृहांत पुरुष, स्त्रियांवर या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या मोफत कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांमध्ये नसबंदीबरोबरच, कॉपर टी बसविणे, स्त्रियांसाठी गर्भनिरोधक गोळी, संतती प्रतिबंधक निरोध, ‘अंतरा’ इंजेक्टेबल गर्भनिरोधक, आदी साधनांचे वाटपही करण्यात येते.
नुकसानभरपाईची सुविधा
महापालिकेच्या एफ/दक्षिण कुटुंब कल्याण केंद्र विभागाला पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया प्रशिक्षण केंद्र म्हणून मान्यता मिळालेली आहे. या शस्त्रक्रियेनंतर वा प्रसूतीपश्चात तांबीनंतर शासन नियमानुसार रुग्णाला मोबदला दिला जातो. तसेच अयशस्वी शस्त्रक्रिया, तसेच दुर्दैवाने मृत्यू झाल्यास मृतांच्या वारसांना नुकसानभरपाईदेखील दिली जाते.
३ वर्षांतील कामगिरी
तीन वर्षांमध्ये शहरात पुरुष आणि स्त्रियांच्या मिळून एकूण ३४ हजार ८०५ नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यात १४६७ पुरुष आणि ३३ हजार ३३८ स्त्रियांचा समावेश आहे. या कालावधीत १० हजार १७५ महिलांना ‘अंतरा’ इंजेक्टेबल गर्भनिरोधक इंजेक्शन देण्यात आले.
त्याचप्रमाणे एकूण ६१ हजार ३५३ महिलांना कॉपर टी बसविण्यात आली असून, एकूण ३२ हजार ७० जणांना निरोध देण्यात आले. एकूण ५६ हजार महिलांना गर्भनिरोधक गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.