Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधित महिलेची यशस्वी सिझेरियन प्रसूती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 19:57 IST

माता व बाळ दोघेही सुखरूप

 

मुंबई : पूर्व उपनगरातील रुग्णालयात करोनाबाधित मातेने एका मुलीला जन्म दिला असून माता आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत. सिझेरियन पद्धतीने ही प्रसूती करण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे. विशेष म्हणजे, करोना उद्रेकाच्या परिस्थितीमध्ये योग्य पद्धतीने काळजी घेऊन प्रसूती केल्याने आई आणि बाळ दोघांनाही धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

शाहीन शेख (नाव बदललेले) असे या महिलेचे नाव आहे. सरकारी प्रोटोकॉलनुसार या महिलेची ३८ व्या आठवड्यात कोविड-१९ चाचणी करण्यात आली. ही चाचणी पॉझिटीव्ह आल्याने महिलेसह कुटुंबियांच्या चिंतेत भर पडली.  कुटुंबात कोणालाही कोरोनाचा संसर्ग नसताना शेख यांना लागण झाल्याने कुटुंबिय घाबरून गेले होते. अशा अवघड परिस्थितीत पूर्व उपनगरातील एका रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ व प्रसूतिशास्त्रज्ञ डॉ. अंजली तळवलकर यांनी या कुटुंबांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. कुटुंबियांचे समुपदेशन केल्यानंतर या महिलेला रूग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते.

या महिलेची २८ एप्रिल रोजी सिझेरियन प्रसूती करण्यात आली. ही प्रसूती यशस्वी झाली असून या महिलेने मुलीला जन्म दिला आहे.  डॉ. अंजली तळवलकर यांच्यासह सहाय्यक सर्जन डॉ. श्रीराम गोपाल आणि भूलतज्ज्ञ डॉ. अवंती भावे यांनी ही प्रसूती यशस्वी केली आहे. बाळ आईच्या संपर्कात येणार नाही, यासाठी तातडीने तिला स्वतंत्र अतिदक्षता विभागात ठेवले आहे. डॉ. धीरेन कालवाडिया यांच्या देखरेखीखाली मुलीवर उपचार सुरू आहे. डॉ. अभय विसपुते म्हणाले की, ही एक गुतांगुतीची शस्त्रक्रिया होती. परंतु, प्रयत्नांमुळे माता व बाळ दोघेही सुखरूप आहेत. सध्या कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता लवकरात लवकर मुंबई कोरोना मुक्त करण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा आमचा प्रयत्न राहील.

-------------------------------

- ही महिला कोरोना संक्रमित असूनही योग्य देखरेखीमुळे तिच्या बाळाला या आजाराचा संसर्ग झालेला नाही.

- त्यामुळे गर्भवती महिलांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी घाबरून जाऊ नयेत.

- माता जरी कोरोनाबाधित असली तरी गर्भातील बाळाला याचा संसर्ग होण्याची शक्यता फार कमी आहे म्हणून घाबरू नका.

- सध्या आईच्या दुधात विषाणूचा पुरावा नाही. हा विषाणू श्वासोच्छवासाच्या थेंबाद्वारे पसरतो हे लक्षात घेता, आईंनी आपले हात धुवावेत आणि मुलांच्या विषाणूचा धोका कमी करण्यासाठी फेस मास्क घालणे गरजेचे आहे. 

- बाळाला बाटलीने दुध पाजताना आईने हात स्वच्छ धुवावेत. याशिवाय गर्भवती महिलांनी रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी योग्य तो पोषक आहार घ्यावा.

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्याकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसआरोग्य