Study - Teaching planning | कोरोनामुळे शाळा बंद, मग कसं असेल अध्ययन-अध्यापनाचे नियोजन

कोरोनामुळे शाळा बंद, मग कसं असेल अध्ययन-अध्यापनाचे नियोजन

कोरोनाचे सावट शाळा, अध्ययन, अध्यापनावरही आहे. पण, हरून चालणार नाही. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी कोरोनाप्रतिबंधक पूर्वनियोजन व महत्त्वपूर्ण उपाययोजना करून शिक्षणाचा ज्ञानदीप अखंड तेवत ठेवणे शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक, पालक, सरकार या सर्वांचीच जबाबदारी आहे.

घरात दीर्घ काळ कोंडून घेऊन मुले, शिक्षक व पालकही अक्षरश: कंटाळले आहेत. शाळेची अनिवार ओढ त्यांना लागणे साहजिकच आहे. खरेच, शाळा मुलांनी फुलून जातील? हो निश्चित! आजही अनेक पालकांच्या मनात कोरोनाचा राक्षस मुलांच्या सार्वजनिक सुरक्षेबाबत भीती दाखवतोय! हो असू शकतो, पण ती भीतीही कमी होत जाईल! खरेच, पालक मुलांना शाळेत पाठवतील? शाळा पुन्हा उघडतील? मुलांच्या सुरक्षेबाबत शासन, संस्था, शाळा, ग्रामस्थ निश्चित खात्री देऊ शकतील का?

समजा, उद्या अचानक शाळा सुरू झाल्या, तर प्रत्येक शाळेकडे विद्यार्थ्यांच्या सहीसलामत सुरक्षेसाठी खरेच पूर्वनियोजन आहे का? पूरक साधनसामग्रीची उपलब्धता आहे? असे एकना अनेक प्रश्न यानिमित्ताने समोर येतील. शाळा उघडणारच व औपचारिक शिक्षणही सुरू होणार. यासाठी काही गोष्टींचे पूर्वनियोजन आधी करणे गरजेचे आहे.
(लेखक ज्ञानदीप विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, वालीव, वसईचे
माजी प्राचार्य आहेत.)

सांस्कृतिक कार्यक्रम, सभा समारंभ
सामूहिक कार्यक्रमांसाठी, जयंती, पुण्यतिथी, सभा, संमेलने, शिबिरे, भाषणे यासाठी मुलांना आपण एकत्र बोलावतो. पण, असे काही समारंभ टाळता येण्यासारखे आहेत, ते टाळावेत. काही भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रम यू-ट्युब किंवा व्हिडीओमार्फत मुलांना शालेय व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरही टाकता येतील.

शैक्षणिक क्षेत्रभेटी व सहली
शैक्षणिक क्षेत्रभेटी व सहली यातून मुलांना प्रत्यक्ष क्षेत्रभेटीचा अनुभव व आनंद मिळतो. भौगोलिक व मानवी जीवनाची माहिती मिळते. मुलांना संदर्भ देऊन पालकांच्या निगराणीखाली क्षेत्रप्रदेश विशेष पाहण्यास सांगता येतील, पण ही शक्यता सर्वांनाच शक्य होईल, असे नाही. कारण, स्मार्ट मोबाइलची सुविधा असणे गरजेचे आहे.

सुरक्षा महत्त्वाची

प्रथमत: शाळा व संस्थाप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांनी एकत्र येऊन अभ्यासक्रमाचे नव्हे तर विद्यार्थी सुरक्षेचे नियोजन केले पाहिजे. मुलांच्या सुरक्षिततेसाठी संस्था, शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, सेवक, ग्रामस्थ, शालेय समित्या काय उपाययोजना करणार आहोत, हे सांगून पालकांचा विश्वास संपादन करावा लागेल. काही सातत्यपूर्ण उपाययोजना कराव्या लागतील.

शाळा निर्जंतुकीकरण : शाळेच्या परिसराची अंतर्बाह्य स्वच्छता, वर्गखोल्या, खिडक्या, बाके, खुर्च्या, टेबले, कपाटे, पाण्याची ठिकाणे, मुताऱ्या, शौचालये, इत्यादी सर्व ठिकाणांची योग्य ती निगा, निर्जंतुकीकरण नित्यनियमाने करणे गरजेचे आहे. हात धुण्यासाठी मुलांना पुरेसे पाणी, साबण, हॅण्डवॉश व सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी लागणारी शिस्त महत्त्वाची! पिण्याचे शुद्ध पाणी हवे. हे अव्याहतपणे करावे लागणार आहे! त्यासाठी शिक्षक यंत्रणा सजग हवी.
सॅनिटायझर गरजेचे : शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर सॅनिटायझर स्प्रे मारून मुलांचे कपडे, दप्तरे, चपला, शूज, डबे निर्जंतुक करावी लागतील. पुन्हा सॅनिटायझर वर्गावर्गांत हाताला चोळणे व शाळेतून घरी जातानाही पुन्हा सर्व असे निर्जंतुक करावे लागेल. हे एक दिवसासाठी नसेल, तर अनेक महिन्यांसाठी, कदाचित कायमस्वरूपी! याचे नियोजन करावे लागेल.
फेरीवाले व फास्ट फूडविक्रेते : शाळेबाहेर अनेक फेरीवाले विविध पदार्थ विकतात. ही माणसे हटवणे म्हणजे एक महायुद्धच! अशा शाळेबाहेरच्या फेरीवाल्यांचा बंदोबस्त करावा लागेल.
आरोग्य तपासणी शिबिर : शाळा मुलांची वर्षातून किमान दोनदा आरोग्यतपासणी करीत असतात. काही याला अपवादही असतील, पण आता किमान महिन्याला तरी मुलांची आरोग्यतपासणी करावी लागेल. प्रत्येक शाळेत रिफ्रेड स्कॅनिंग मशीनने शाळेतील मुलांचे तापमान टेस्ट करणे गरजेचे आहे.
वर्ग, अध्ययन, अध्यापन : एका वर्गात आज ६०-७० विद्यार्थी असतात. अशावेळी सुरक्षित अंतर कसे ठेवणार? त्यासाठी फेस मास्क एज्युकेशन ही जीवन प्रणाली सर्वांनाच अवलंबवावी लागेल. यापुढे मास्क हा आपल्या पोशाखाचा एक भाग होणार आहे. मास्क घालण्यासाठी मुलांचे सकारात्मक प्रबोधन करावे लागेल.
खेळ खेळू अंतरे : शरीरस्पर्शी खेळांपेक्षा सुरक्षित अंतर ठेवून खेळले जाणारे क्रिकेट, हॉकी, टेनिस, व्हॉलिबॉल असे खेळ काळजी घेऊन व जागेची उपलब्धता पाहून शिक्षकांच्या उपस्थितीत खेळता येऊ शकतील. क्रीडा साहित्याचे निर्जंतुकीकरणही आवश्यक आहे.
पूर्वनियोजनाने संभाव्य धोके टाळता येतील : मुलांच्या व सर्व जनतेच्या सुरक्षेसाठी शासनाने तत्काळ अनेक लोकहिताचे निर्णय घेतले. ऐनवेळी परीक्षाही रद्द कराव्या लागल्या.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Study - Teaching planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.