लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार शिक्षण विभागातर्फे सर्व शाळांमध्ये स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमांत दहिसरच्या विद्याभूषण हायस्कूलने विद्यार्थ्यांच्या मदतीने गच्चीवर छोट्या शेतीचा प्रयोग केला आहे. या योजनेत खासगी आणि सरकारी अशा सर्वच शाळांचा समावेश आहे. त्याकरिता शाळांना ३० सप्टेंबरपर्यंत नोंदणी करावी लागणार असून, त्याची प्रक्रिया १ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. या मूल्यांकनात पाणी, शौचालये, हात धुण्याची सुविधा, संचालन व देखभाल, वर्तन बदल व क्षमता बांधणी आणि ‘मिशन लाइफ’ या सहा घटकांवरील ६० प्रश्नांचा समावेश आहे. जिल्हास्तरावरील मूल्यांकन १ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान होणार आहे.
मोहिमेची वैशिष्ट्ये...-नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे. -शेती आणि पर्यावरणाविषयी मुलांच्या जाणिवेचा विकास होण्यास मदत होणार आहे.-जिल्हा व राज्यस्तरीय तपासणी व नामांकन होते.
आमच्या शाळेत योजनेंतर्गत केलेल्या छोट्या शेतीच्या प्रयोगामुळे आले, मिरची ही पिके कशी येतात, हे प्रत्यक्षात मुलांना अनुभवामुळे समजले. त्यामुळे अनुभवांती शेतीविषयक त्यांचा दृष्टिकोन विकसित झाला. संजय पाटील, मुख्याध्यापक, विद्याभूषण हायस्कूल, दहिसर
रेटिंग पद्धत अशी...रेटिंग पद्धतीनुसार ३५ टक्क्यांपेक्षा कमी पालन करणाऱ्या शाळांना एक तारा, तर ९० ते १०० टक्के पालन करणाऱ्यांना पाच तारे मिळतील. दहिसर येथील विद्याभूषण हायस्कूलने या योजनेनुसार स्वच्छ आणि हरित विद्यालय याचा प्रयोगही सुरू केला आहे. आम्ही वांगी, मिरची, आले या पिकांचे बी पेरले आहे. आता त्यातून रोपे उगवली असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे, असे शाळेतील दहावीचे विद्यार्थी करण पवार आणि रिया जाधव यांनी सांगितले.