शाळेत राजकीय कार्यक्रम झाल्यास विद्यार्थ्यांची मने कलुषित होतील - वर्षा गायकवाड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 02:20 AM2020-01-14T02:20:00+5:302020-01-14T06:30:40+5:30

राजकीय कार्यक्रमांसाठी शाळांना मनाई : राजकारणासाठी विद्यार्थ्यांचा वापर नको

Students' minds will be corrupted if political events take place in the school - Varsha Gaikwad | शाळेत राजकीय कार्यक्रम झाल्यास विद्यार्थ्यांची मने कलुषित होतील - वर्षा गायकवाड

शाळेत राजकीय कार्यक्रम झाल्यास विद्यार्थ्यांची मने कलुषित होतील - वर्षा गायकवाड

googlenewsNext

मुंबई : मुंबईतील एका विद्यालयात सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ विद्यार्थ्यांकडून पोस्टकार्ड लिहून घेण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावतानाच राज्यभरातील शाळांनाही विद्यार्थ्यांचा राजकीय वापर करू देऊ नका, अशी तंबी बजावण्यात आली आहे. तर शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्याशी संबंधित कार्यक्रम व्हायला हवेत. शाळांमध्ये राजकीय कार्यक्रम झाल्यास विद्यार्थ्यांची मने कलुषित होतील. निदान शाळांना तरी राजकारणापासून दूर ठेवायलाच हवे, अशी भावना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत व्यक्त केली.

मुंबईत माटुंगा येथील दयानंद बालक, बालिका विद्यालयात सीएए समर्थनासाठी विद्यार्थ्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यासाठी पोस्टकार्ड लिहून घेण्यात आली. या प्रकरणाची शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी गंभीर दखल घेतली आहे. शाळांना राजकारणात ओढता कामा नये, असे सांगतानाच राजकीय विचार पसरविण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर केल्याबद्दल शिक्षणमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, या प्रकरणी दयानंद बालक आणि बालिका विद्यालयाचीही चौकशी करण्यात येत असून मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजवण्यात आली आहे. सीएए कायदा लागू झाल्यापासून देशात डाव्या संघटना आणि विरोधी पक्षांनी आंदोलने केली. त्याला प्रतिउत्तर म्हणून भाजपनेही समर्थनार्थ मोर्चे काढले. याशिवाय, विविध ठिकाणी व्याख्याने, कार्यशाळांचे आयोजन केले जात आहे. काही शैक्षणिक संस्थांमध्येही याबाबतचे कार्यक्रम झाले. दयानंद कनिष्ठ महाविद्यालयातही सीएएच्या समर्थनार्थ सभा घेण्यात आली. तसेच कायद्याच्या समर्थनाचे पोस्टकार्ड विद्यार्थ्यांकडून तयार करून घेण्यात आले होते. याची दखल घेऊन ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

तसेच राज्यभरातील शाळांनाही नोटीस काढण्यात आली. ‘राजकीय तसेच संवेदनशील कार्यक्रमांमध्ये शाळा व विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब शालेय शिस्त बिघडवणारी तसेच विद्यार्थ्यांच्या बालमनावर चुकीचे संस्कार व शैक्षणिक प्रगतीला बाधा आणणारी आहे. त्यामुळे राजकीय तसेच संवेदनशील कार्यक्रम शाळेच्या आवारात घेऊ नयेत तसेच विद्यार्थ्यांनाही या कार्यक्रमात सहभागी करू नये’, असे निर्देश शिक्षण संचालकांनी राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदा तसेच खासगी शाळांना दिले आहेत.

पोखरणकर यांच्यावर कारवाई करावी!
कार्यक्रम घेण्याऱ्या मुंबईतील शाळांना शिक्षण उपनिरीक्षक पोखरणकर यांच्या सहीने नोटीस देत ताबडतोड उत्तर द्या, असे नोटीसीत नमूद केले आहे. इतक्या तातडीने नोटीस देणे आणि तातडीने उत्तर मागणे हे बेकायदा आहे. नोटीस देऊन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाºया पोखरणकर यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

Web Title: Students' minds will be corrupted if political events take place in the school - Varsha Gaikwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.