विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; मानवी हक्क आयोगाकडून दखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 06:57 IST2025-07-03T06:56:13+5:302025-07-03T06:57:33+5:30
अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी येथील नदीवर पूल नसल्याबाबत ‘लोकमत’ने ३० जून रोजी वृत्त प्रकाशित केले होते. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने त्याची दखल घेतली आणि स्यू मोटो याचिका दाखल करून घेतली.

विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; मानवी हक्क आयोगाकडून दखल
मुंबई : अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी येथील नदीवर पूल नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी झाडाच्या फांदीवरून दोरीच्या साहाय्याने तोल सांभाळत प्रवास करावा लागत आहे. याप्रकरणी मानव हक्क आयोगाने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत ही नोटीस बजावली आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी येथील नदीवर पूल नसल्याबाबत ‘लोकमत’ने ३० जून रोजी वृत्त प्रकाशित केले होते. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने त्याची दखल घेतली आणि स्यू मोटो याचिका दाखल करून घेतली. आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती (नि.) अनंत बदर यांनी या प्रकरणाची सुनावणी घेऊन नाशिकचे विभागीय आयुक्त, नंदुरबारचे जिल्हाधिकारी व नंदुरबारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना नोटीस बजावली आहे. प्रकरणाचा वस्तुस्थितिदर्शक अहवाल आठ आठवड्यांत सादर करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.
अहिल्यानगर प्रकरणात महावितरणच्या एमडींना नोटीस
अहिल्यानगर येथे विजेचा धक्का लागून काकासाहेब शिकारे व गौतम शिकारे या पिता-पुत्राचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २४ जून रोजी प्रकाशित केले होते.
या वृत्ताचीही दखल आयोगाने घेतली आहे. याप्रकरणी आयोगाने महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांना नोटीस बजावली असून, आठ आठवड्यात वस्तुस्थितिदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
याशिवाय अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक यांनीदेखील वस्तुस्थितिदर्शक अहवाल सादर करावा, संबंधित पोलिस स्थानकात अपघाती मृत्यूची नोंद झाली असल्यास त्याची प्रत द्यावी, असे निर्देश आयोगाने दिले आहेत.