शाळेमध्येही विद्यार्थी असुरक्षित!शिक्षक, सुरक्षारक्षकांकडून लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 13:21 IST2026-03-08T13:21:17+5:302026-03-08T13:21:35+5:30
अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेच बसविले नाही

AI Generated Image
मुंबई : शाळेचे सुरक्षारक्षक, बसचालकांकडून विद्यार्थ्यांवर अत्याचार करत असल्याच्या घटना समोर येत असतानाच आता शाळेतील शिक्षकांसह मुख्याध्यापकांकडून शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचारांच्या घटना डोके वर काढत आहेत. त्यामुळे शिक्षण घेण्यासाठी येणारी मुले शाळेतही असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे. आजही अनेक शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आलेले नाहीत.
विद्यार्थ्यांवरील शारीरिक अत्याचार रोखण्यासाठी सुरू केलेल्या पोलिस दीदी उपक्रमामुळे अनेक घटनांचा वाचा फोडण्यास मदत झाली. पोलिस दीदी उपक्रमांतर्गत स्थानिक पोलिस प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना ‘गुड टच, बॅड टच’, अनोळखी व्यक्तीने आमिष दाखवल्यास, पाठलाग केल्यास काय करावे, याबाबत प्रशिक्षित केले जाते. यामुळे शारीरिक अत्याचाराचे अनेक गुन्हे रोखण्यात यश आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
नाटकात निवड करण्याच्या बहाण्याने...
नाटकात निवड करणार असल्याचे सांगत ४० वर्षीय शिक्षकाने १३ वर्षीय विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याची घटना वरळीत घडली. या प्रकरणी एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यात आला. या घटनेमुळे पालकांनी संताप व्यक्त केला.
मुख्याध्यापक अटकेत
प्रियकराची माहिती पालकांना देण्याची भीती घालून नागपाडा येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या मुख्याध्यापकाने त्याच्या कार्यालयातच १४ वर्षीय विद्यार्थिनीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले होते. त्याची विकृती वाढताच मुलीने घडलेला प्रकार पालकांना सांगितला आणि मुख्याध्यापकाच्या अत्याचाराला वाचा फुटली. या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी अंजुम खान (५५) याच्यावर पॉक्साे कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला होता.
‘पालकांनाे, मुलांवर लक्ष ठेवा’
मुलांच्या प्रत्येक हालचालींसह त्यांचे वागणे, स्वभावात झालेले बदल यावर पालकांनी लक्ष ठेवणे गरजेचे बनले आहे. हेरगिरी नाही किमान त्याच्या नकळत प्रत्येक सवयीकडे लक्ष ठेवा. अतिलाड करणे टाळा. मुलांना चांगल्या, वाईट स्पर्शाची जाणीव करून द्या, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
वर्गात विद्यार्थिनीवर अत्याचार
डिसेंबर २०२२ : वर्गातील अन्य विद्यार्थी डान्सच्या तासासाठी बाहेर जाताच, आठवीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी १३ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.