Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन शिक्षणातून विद्यार्थी शिक्षकांना हवी दिवाळीची सुट्टी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 18:57 IST

Online Education : विद्यार्थी व शिक्षकांना अद्यापपर्यंत कोणतीही सुट्टी जाहीर करण्यात आली नाही.

मुंबई : लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून सलग सहा ते सात महिने ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. उन्हाळी सुट्टीतही ऑनलाईन वर्ग घेण्यात आले. ऑनलाईन वर्गातून विद्यार्थी व शिक्षकांना अद्यापपर्यंत कोणतीही सुट्टी जाहीर करण्यात आली नाही. परिणामी विद्यार्थी, शिक्षक व पालकही तणावाखाली आहेत. गणेशोत्सवाची सुट्टीही कळवण्यात आली नव्हती. त्यामुळे किमान दिवाळीच्या सुट्टीची तारीख वेळेत जाहीर करण्यात यावी, अशी मागणी पालक, विद्यार्थी व शिक्षकांकडून होत आहे.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शाळांनी एप्रिलपासून ऑनलाईन वर्ग सुरू केले आहेत. त्यामुळे सलग सहा महिने ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. या सहा महिन्यांमध्ये कोणतीही मोठी सुट्टी जाहीर करण्यात आली नाही. गणेशोत्सवाची सुट्टीची तारीख न कळवताच अचानक जाहीर करण्यात आली. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत कोणतीही मोठी सुट्टी मिळाली नाही. त्यातच आता अनेक शाळांनी ऑनलाईन प्रथम सत्र परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यावर काही पालकांनी प्रथम सत्र परीक्षा दिवाळीनंतर शाळा सुरू झाल्यावर घेण्यात यावी, अशी विनंती शाळांना केली आहे. मात्र शाळा वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्यावर ठाम आहे. त्यातच काही शाळांनी या परीक्षेत सविस्तर उत्तरे लिहिण्याच्या प्रश्नावर भर दिला आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ऑनलाईन वर्ग सुरू झाल्यापासून सलग शिक्षण सुरू आहे. त्यामुळे आता दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी व पालक करू लागले आहेत. विद्यार्थी व पालकांची मागणीची दखल घेत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी, शिक्षण विभागाने दिवाळी सुट्ट्या जाहीर करण्याची मागणी केली आहे.

सविस्तर प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना घरी बसून लिहायची असली तरी त्यांनी उत्तरपत्रिकेचे फोटो काढून परीक्षकांना पाठवावेत. शिक्षकांनी त्याच्या प्रिंट काढून तपासावे असे शिक्षकांना कळवले आहे. त्यामुळे शिक्षकांसाठी सुद्धा ही परीक्षा त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे शिक्षकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. सरकारने या काळात शिक्षकांना झालेल्या मानसिक त्रासाचीही दखल घ्यावी अशी प्रतिक्रिया शिक्षकलोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी व्यक्त केली आहे.  

टॅग्स :शिक्षणऑनलाइनमुंबईदिवाळी