Student give Exam from Tata Cancer Hospital Overcoming Disease | आजारावर मात करत टाटा कॅन्सर रुग्णालयातून दिली परीक्षा 

आजारावर मात करत टाटा कॅन्सर रुग्णालयातून दिली परीक्षा 

मुंबई : दहावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा. त्यानंतर, पुढील आयुष्यात नेमके करिअर कशात करायचे, कुठला मार्ग निवडायचा, याचा मार्ग विद्यार्थी निवडतात. एकप्रकारे विद्यार्थी परीक्षेशी झुंज देत असतात. मात्र, ही झुंज देताना अनेक विद्यार्थी आयुष्याशीही झुंज देऊन प्रत्येक परिस्थितीला जिद्दीने सामोरे जातात.

माहिमच्या कोनोसा कॉन्व्हेंट हायस्कूलची विद्यार्थिनी कर्करोगाशी अशीच झुंज देत असताना, अचानक तिला टाटा कॅन्सर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले. दहावीची परीक्षा द्यायचीच, अशी इच्छा असणाऱ्या सागिरा अजेद अली मलिकच्या या इच्छेला मुंबई विभागीय मंडळाची मदत मिळाली. सागिरा या कर्करोगग्रस्त विद्यार्थिनीला टाटा कॅन्सर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिने परीक्षा देण्याची इच्छा व्यक्त केल्याचे पत्र शुक्रवारी सकाळी १० वाजता मुंबईच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाले. मंडळाचे सचिव संदीप संगवे यांनी शाळेच्या पत्राची तत्काळ दखल घेत, सागिरासाठी आवश्यक ती तयारी रुग्णालयात करत तिला रुग्णालयातून परीक्षा देण्याची परवानगी दिली.

मदत करू शकलो याचे समाधान
विद्यार्थिनीची परीक्षा देण्याची इच्छा असल्याने ही तजवीज करण्यात आली. त्यासाठी आवश्यक तयारी करून तिला परीक्षा रुग्णालयातून देण्याची परवानगी अत्यंत कमी वेळात मंडळाने दिली. मात्र, अशा गंभीर आजारातून जात असताना विद्यार्थिनीची परीक्षा देण्याची जिद्द पाहून मंडळाकडून आम्ही मदत करू शकलो, याचे आम्हाला समाधान आहे.
- संदीप संगवे, सचिव, मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

Web Title: Student give Exam from Tata Cancer Hospital Overcoming Disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.