एसटीचा ‘आवडेल तिथे प्रवास’ महागला; वर्षभर आता एकच दर लागू करण्याचा महामंडळाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 09:23 IST2025-01-31T09:23:22+5:302025-01-31T09:23:40+5:30

राज्यात एसटी तिकीट दरात १४.९५ टक्के दरवाढ लागू झाली असून वाढीव दरानुसार आवडेल तेथे प्रवास योजनेतील पास दर वाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.

ST's travel wherever you want scheme has become expensive | एसटीचा ‘आवडेल तिथे प्रवास’ महागला; वर्षभर आता एकच दर लागू करण्याचा महामंडळाचा निर्णय

एसटीचा ‘आवडेल तिथे प्रवास’ महागला; वर्षभर आता एकच दर लागू करण्याचा महामंडळाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क , मुंबई : राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ या योजनेसाठी आता वर्षभर एकच दर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जुन्या नियमांमध्ये आणि अटी शर्तीमध्ये सुधारणा केल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. असे असले तरी तिकीट दर वाढीनंतर आवडीच्या प्रवास पाससाठी देखील सर्वसामान्यांना आता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.

एसटी महामंडळाकडून ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेंतर्गत ४ आणि ७ दिवसांचे पास देण्यात येतात. यासाठी वर्षभर वेगवेगळे हंगामी दर लावण्यात येत असत. परंतु महामंडळाने अटी आणि शर्तीमध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे वर्षभर आता एकच दर राहणार आहे. तसेच पासच्या दरामध्ये  श्रेणीनुसार वाढ करण्यात आली असून साध्या गाडीतून प्रवासासाठी ६४४ ते १ हजार १३१ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला अधिकच भुर्दंड सोसावा लागणार आहे. राज्यात एसटी तिकीट दरात १४.९५ टक्के दरवाढ लागू झाली असून वाढीव दरानुसार आवडेल तेथे प्रवास योजनेतील पास दर वाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. याला मंजुरी मिळाली असून ३१ जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर सुधारित दर लागू होणार आहेत.

ई-शिवाईसाठी  सर्वाधिक भाडे 
एसटीच्या ई-शिवाईच्या पासकरिता प्रवाशांना कमीत कमी १४३३ तर जास्तीत जास्त ५००३ रुपये मोजावे लागणार आहेत. 
४ दिवसांच्या ई-शिवाईच्या प्रवास पाससाठी प्रौढांना २,८६१ रुपये,  मुलांना १,४३३ रुपये आणि ७ दिवसांच्या पासकरिता प्रौढांना ५००३ आणि मुलांना २,५०४ रुपये मोजावे लागणार आहे.

राज्यातील तीर्थस्थळे, पर्यटन स्थळ आणि अन्य प्रेक्षणीय स्थळांसाठीच्या विना व्यत्यय प्रवास करता यावा, यासाठी एसटी महामंडळाने आवडेल तेथे प्रवास योजना सुरू केली.  योजनेंतर्गत विशेष पास देण्यात येत असून पासच्या माध्यमाने राज्यातील सर्व बसगाड्यांमधून अमर्यादित प्रवासाची मुभा आहे.  १२ वर्षांखालील मुलांना मोफत प्रवासाची सुविधा योजनेत आहे.

Web Title: ST's travel wherever you want scheme has become expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.