एसटीच्या ४ हजार ९८७ बसेस फुल्ल; गणपती उत्सवासाठी यंदा ५,२०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 12:42 IST2025-08-19T12:42:25+5:302025-08-19T12:42:51+5:30

या माध्यमातून प्रवास करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिकांना विशेष बसमध्ये सवलत असणार आहे

ST's 4,987 buses are full; decision to run 5,200 more buses this year for Ganpati festival | एसटीच्या ४ हजार ९८७ बसेस फुल्ल; गणपती उत्सवासाठी यंदा ५,२०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय

एसटीच्या ४ हजार ९८७ बसेस फुल्ल; गणपती उत्सवासाठी यंदा ५,२०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गणेशोत्सवाला आठवडा शिल्लक असताना राज्य परिवहन (एसटी) महामंडळाकडून उत्सव विशेष वाहतुकीला वेग आला आहे. मुंबई, ठाणे व पालघरमधील चाकरमान्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या गणपती उत्सवासाठी यंदा २२ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरदरम्यान ५,२०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी ४ हजार ९८७ बस १८ ऑगस्टपर्यंत फुल्ल झाल्या आहेत.

चाकरमान्यांना आरामात प्रवास करता येण्यासाठी एसटी महामंडळाने विशेष बस घोषित केल्या आहे. या जादा गाड्यांपैकी जवळपास ९५ टक्के बसचे आरक्षण पूर्ण झाले आहे. या माध्यमातून प्रवास करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिकांना विशेष बसमध्ये सवलत असणार आहे. नियमित एसटी स्टॅण्डवरील गर्दी टाळण्यासाठी महामुंबईत तात्पुरते ४० बस थांबेदेखील निश्चित केले आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार बस थांब्यावरून कोकणात जादा बस चालवण्यात येणार आहेत. 

गौरी-गणपतीत जादा वाहतुकीसाठी मुंबई, पालघर, ठाणे विभागातून प्रवाशांच्या मागणीनुसार ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही स्वरूपात जादा गाड्या आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात येत आहेत, असे एसटीतील अधिकाऱ्यांनी सांगितले. 
मुंबई-कोकण रस्ते प्रवास सुसह्य व्हावा, यासाठी समूह आरक्षण करताना नव्या आणि आसने, खिडक्या  सुस्थितीत असलेल्या बसगाड्यांची मागणी केली होती. त्यानुसार त्या उपलब्ध केल्या जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

२२ ते २७ ऑगस्टचे बुकिंग
विभाग    आरक्षण 

मुंबई    १,७९०
पालघर    ६४०
ठाणे    २,५५७

महामार्गावर ठिकठिकाणी दुरूस्तीसाठी पथके तैनात

गणेशोत्सवादरम्यान वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथकेदेखील तैनात करण्यात येणार आहेत.

जादा वाहतूक करण्यात येणारी ठिकाणे

  • मुंबई सेंट्रल - साईबाबा, काळाचौकी, गिरगाव, कफपरेड, काळबादेवी, महालक्ष्मी
  • परळ - सेनापती बापट मार्ग दादर, मांगल्य हॉल (जोगेश्वरी)
  • कुर्ला नेहरूनगर – बर्वे नगर / सर्वोदय हॉस्पिटल (घाटकोपर), टागोर नगर (विक्रोळी), घाटला (चेंबूर), डी.एन. नगर (अंधेरी),  गुंदवली (अंधेरी), आनंद नगर / शास्त्री नगर (सांताक्रुझ), विलेपार्ले, खेरनगर, वांद्रे, सायन.
  • ठाणे- लोकमान्य नगर, श्रीनगर, विटावा (ठाणे), भाईंदर, नॅन्सी कॉलनी (बोरिवली), मालाड, डहाणूकरवाडी / चारकोप (कांदिवली), महंत चौक (जोगेश्वरी), संकल्प सिद्धी गणेश (गोरेगाव), भांडूप (पश्चिम,पूर्व), मुलुंड
  • विठ्ठलवाडी – बदलापूर, अंबरनाथ
  • कल्याण - डोंबिवली
  • नालासोपारा- नालासोपारा
  • पनवेल - पनवेल आगार
  • उरण - उरण आगार
  • वसई - वसई आगार
  • अर्नाळा - अर्नाळा आगार

Web Title: ST's 4,987 buses are full; decision to run 5,200 more buses this year for Ganpati festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.