Join us

मुंबईकरांच्या तोंडाला पुन्हा एकदा पाने पुसणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा तीव्र निषेध- अतुल भातखळकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 13:05 IST

16 ते 18 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे झोपडपट्टी, चाळीत राहणारे नागरिक, छोटे दुकानदार, मध्यम वर्गीय यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

मुंबई-  महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना मदत करण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या कथित 11500 कोटी रुपयांच्या पॅकेजमध्ये मुंबईतील बाधितांच्या मदतीचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नसून, अतिवृष्टीमुळे करोडो रुपयांचे नुकसान झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांच्या तोंडाला पुन्हा एकदा पाने पुसण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केल्याची टीका भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

16 ते 18 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे झोपडपट्टी, चाळीत राहणारे नागरिक, छोटे दुकानदार, मध्यम वर्गीय यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. चेंबूर, मुलुंड या ठिकाणी दरड कोसळून ४० पेक्षा जास्त नागरिकांचे नाहक बळी गेले. हनुमाननगर, पोयसर, दिंडोशी, गोवंडी, निबारपाडा, विक्रोळी या परिसरात शेकडो घरे जमीनदोस्त झाली, हजारो घरांमध्ये पाणी जाऊन घरगुती साहित्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

२००५ साली झालेल्या नुकसानापेक्षा अधिकचे नुकसान झाल्यामुळे तात्काळ नजर पंचनामे करून महाराष्ट्रातील आपत्तीग्रस्तांना मदत करतानाच मुंबईतील बाधितांना सुद्धा मदत करावी अशी मागणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली होती. परंतु केवळ मतांसाठी ‘करून दाखवलं’ म्हणणाऱ्या ठाकरे सरकारने करोडो रुपयांचे नुकसान झालेल्या मुंबईकरांना मदतीच्या नावाने ठेंगा दाखविण्याचे काम केले आहे. हे अत्यंत संतापजनक असून मुंबई भारतीय जनता पार्टी ठाकरे सरकारचा तीव्र निषेध करते. याविरोधात मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने लवकरच मोठे जनआंदोलन करणार असल्याचा इशारा सुद्धा आमदार भातखळकर यांनी दिला आहे.

टॅग्स :अतुल भातखळकरभाजपामहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकार