Stray Dogs: लाखभर भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्रे उभारणार कुठे? पालिकेसमोर मोठे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 15:46 IST2025-11-18T15:44:00+5:302025-11-18T15:46:07+5:30
Mumbai Stray Dog Shelter Home Crisis: भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्रे उभारण्याची सूचना न्यायालयाने केल्यामुळे मुंबई महापालिकेची धावपळ उडाली.

Stray Dogs: लाखभर भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्रे उभारणार कुठे? पालिकेसमोर मोठे आव्हान
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्रे उभारण्याची सूचना न्यायालयाने केल्यामुळे मुंबई महापालिकेची धावपळ उडाली आहे. शहरात जवळपास ९५ हजार भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्रे उभारणे पालिकेपुढे मोठे आव्हान असून, खरोखरच सगळ्या भटक्या श्वानांची या केंद्रात व्यवस्था होणार की सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कागदावर राहणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. भटक्या श्वानांची संख्या रोखण्यासाठी महापालिकेने वेगाने निर्बिजीकरण सुरू केले असले, तरी श्वानांची दहशत वाढतेच आहे. त्यामुळे निर्बिजीकरण करून त्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्याचा निर्णय घेतला असून, गेली अनेक वर्षे निर्बिजीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे.
मुंबईत वर्षाला जवळपास लाखभर लोकांना श्वान दंश होतो अशी माहिती आहे. यापैकी काही रुग्ण मुंबईबाहेरचेही असू शकतात, असे पालिकेच्या पशुवैद्यक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यापैकी काही चाव्यांची नोंद पालिकेच्या रुग्णालयात होते. मात्र, खासगी रुग्णालयांतील नोंदीचा नेमका आकडा उपलब्ध नसल्याने नेमके चित्र स्पष्ट
होत नाही.
पालिकेच्या केंद्रात ४० हजार श्वानांची व्यवस्था; मनुष्यबळाची गरज
महापालिका उभारणार असलेल्या ठिकाणी सुमारे ४० हजार श्वानांची व्यवस्था होऊ शकते. ज्या ठिकाणी श्वानांचा उपद्रव जास्त असेल, त्या विभागातून जास्त तक्रारी येत असतील, त्या ठिकाणचे श्वान उचलण्यावर महापालिकेचा मुख्य भर असेल. ही निवारा केंद्रे उभारण्यासाठी महापालिकेला मोठ्या प्रमाणावर सुविधा आणि मनुष्यबळ उभे करावे लागणार आहे.
रेबीज प्रतिबंधक लसीकरण अभियान राबवणार
पालिका एक सहा महिन्यांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण अभियान सुरू करणार आहे, जे शहरात भटक्या कुत्र्यांवर लक्ष केंद्रित करेल. २०२४ च्या अखेरपर्यंत दर आठवड्याला सुमारे १५० चाव्यांच्या तक्रारी येत होत्या.