मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी व्यूहरचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 08:33 IST2026-01-15T08:33:02+5:302026-01-15T08:33:27+5:30
सर्वच पक्षांची संघटनात्मक यंत्रणा अधिक सक्रिय

मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी व्यूहरचना
मुंबई: प्रचारातील लाऊडस्पीकरचा भोंगा थांबताच आता प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीची रणनीती राबविण्यासाठी पक्ष कार्यालयांमध्ये हालचालींना वेग आला आहे. आज, गुरुवारी मतदारांना मोठ्या संख्येने मतदानासाठी घराबाहेर कसे काढायचे, याबाबत सविस्तर नियोजन करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला. प्रत्येक पक्षाने आपल्या संघटनात्मक यंत्रणेला पूर्ण ताकदीने कामाला लावले आहे.
पूर्ण ताकदीने कामाला लावले आहे. उद्धवसेना, शिंदेसेना यांच्या पक्षात गटप्रमुख, उपशाखाप्रमुख, शाखाप्रमुख यांना सक्रिय करण्यात आले असून, मनसेकडून गट अध्यक्षांपासून शाखाध्यक्षांपर्यंत जबाबदाऱ्या ठरवण्यात आल्या आहेत. भाजपने पन्ना प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि वॉर्ड अध्यक्षांना मैदानात उतरवत 'की-वोटर्स'च्या माध्यमातून संबंधित मतदारांपर्यंत पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी 'शिवतीर्थ'वर नेत्यांशी संवाद साधून मतदान यंत्रणा मजबूत ठेवण्याचे आवाहन केले, तर मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. अमित साटम आणि मुंबई महापालिका निवडणूक प्रभारी व मंत्री आशिष शेलार यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेऊन सूक्ष्म नियोजनाचा आढावा घेतला
सकाळी चहा-नाश्ता, दुपारी जेवणाची व्यवस्था
काही प्रभागांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी वाहनांची व्यवस्था, सकाळचा चहा-नाश्ता तसेच दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईत प्रत्येक इमारतीबाहेर प्रमुख राजकीय पक्षांचे कार्यकर्ते टेबल-खुर्ची लावून मतदार यादीसह बसण्याची परंपरागत पद्धत यंदाही राबवली जात आहे.
दुपारी ३ नंतर आढावा
आपल्या बूथवरील मतदानाची नोंद ठेवत दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान न केलेल्या मतदारांच्या घरी जाऊन पाठपुरावा करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
मतदाराचे नाव, यादी भाग क्रमांक आणि अनुक्रमांक असलेल्या स्लिप्स वेळेत पोहोचल्याची खातरजमा करण्यावरही बरिष्ठ पातळीवरून विशेष भर देण्यात आला आहे.