२.१२ कोटींचा चोरीचा मुद्देमाल मालकांना परत; १० पोलिस ठाण्यांतर्गत जप्त मुद्देमालाचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 11:53 IST2026-03-25T11:53:13+5:302026-03-25T11:53:13+5:30
तपासादरम्यान हस्तगत केलेली मालमत्ता यात समाविष्ट होती.

२.१२ कोटींचा चोरीचा मुद्देमाल मालकांना परत; १० पोलिस ठाण्यांतर्गत जप्त मुद्देमालाचा समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई पोलिसांच्या परिमंडळ-६ अंतर्गत चोरी व गहाळ प्रकरणांतील जप्त मालमत्ता संबंधितांना परत देण्याचा विशेष उपक्रम मंगळवारी राबविण्यात आला. यावेळी २ कोटी १२ लाख २७हजार रुपयांचा मुद्देमाल तक्रारदारांना सुपुर्द करण्यात आल्याने त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. यामध्ये चेंबूर, गोवंडी, नेहरूनगर, चुनाभट्टी, ट्रॉम्बे, आरसीएफ, मानखुर्द, देवनार, शिवाजीनगर आणि टिळकनगर या १० पोलिस ठाण्यांतर्गत विविध गुन्ह्यांतील समावेश होता. जप्त मुद्देमालाचा जबरी चोरी, घरफोडी, मोबाइल चोरी प्रकरणांमध्ये तसेच गहाळ तपासादरम्यान हस्तगत केलेली मालमत्ता यात समाविष्ट होती.
नागरिकांनी मानले आभार
यामध्ये ट्रॉम्बे पोलिसांनी १० ग्रॅम वजनाचे सुमारे १.६० लाख रुपयांचे सोने, तर चुनाभट्टी पोलिसांनी स्नॅचिंगमधील १२ ग्रॅम वजनाचे सुमारे १.८० लाख रुपयांचे मंगळसूत्र हस्तगत केले. याशिवाय विविध कंपन्यांचे सुमारे ८०० मोबाइल फोन (२.०८ कोटी रुपये किंमत) परत देण्यात आले.
गोवंडी येथे आयोजित कार्यक्रमात अपर पोलिस आयुक्त डॉ. महेश पाटील यांच्या हस्ते हा मुद्देमाल संबंधितांना देण्यात आला. यावेळी पोलिस उपायुक्त समीर शेख यांच्यासह संबंधित पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पोलिसांकडून मालमत्ता परत मिळाल्याने तक्रारदारांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले.