छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अखेर आंतरराष्ट्रीय विमानतळासमोर स्थलांतरित
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 18:12 IST2020-03-11T18:10:49+5:302020-03-11T18:12:35+5:30
2004 साली काम पूर्ण झाल्यावर येथे वाजपेयी आणि शिवसेनाप्रमुखांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येथे बसवण्यात आला होता.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अखेर आंतरराष्ट्रीय विमानतळासमोर स्थलांतरित
- मनोहर कुंभेजकर
मुंबई- अंधेरी (पूर्व)सहार गावा जवळील एलिव्हेटेड रोडच्या खाली असलेल्या आयात गुदमाजवळ 2012 पासून असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अखेर येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ( टी-2 टर्मिनल) समोर गेल्या दि 6 मार्च रोजी स्थलांतरित करण्यात आला.
विलेपार्ले विधानसभा क्षेत्रात पश्चिम दुर्तगती महामार्गावर आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ( टी-2 टर्मिनल) या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे असलेले भव्य पुतळे विदेशी पर्यटक आणि या परिसरातून जात-येत असलेल्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. 1999 साली माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी येथील टी -2 टर्मिनल समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजन केले होते.सदर पुतळ्याच्या चारही बाजूने कुंपण टाकले आहे.
2004 साली काम पूर्ण झाल्यावर येथे वाजपेयी आणि शिवसेनाप्रमुखांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येथे बसवण्यात आला होता. मात्र 2012 साली येथील विमानतळाच्या नूतनीकरणाचे काम सुरू झाल्याने येथील पुतळा हा सहार गावा जवळील वेअर हाऊस येथे बसवण्यात आला होता.
सहार ग्रामस्थ प्रत्येक शिवजयंतीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवजयंती उत्सव साजरा करत होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे,मात्र त्यांचा पुतळा येथे नसल्याने येथील मूळ जागी पुतळा बसवण्यात यावा अशी आग्रही मागणी आम्ही सहारवासीय शिवप्रेमींनी सतत जिव्हीके प्रशासनाकडे केली होती. तर लोकमतने देखिल 2014 पासून सदर विषयी सातत्याने वाचा फोडली होती अशी माहिती वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त निकोलस अल्मेडा आणि गॉडफ्रे पिमेटा यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय व आंतरदेशीय विमानतळामधील महाराज हा शब्द नव्हता.वॉचडॉग फाउंडेशन व लोकमतने याप्रकरणी सातत्याने हा प्रश्न 2014 पासून मांडल्यावर अखेर 3 नोव्हेंबर 2018 रोजी महाराज हा शब्द लागला अशी माहिती निकोलस अल्मेडा आणि गॉडफ्रे पिमेटा यांनी दिली.