मुंबई : भाजप, शिवसेनेने पाच वर्षे खोटे बोलून जनतेची फसवणूक केली. राज्य दुष्काळमुक्त करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान आणि उद्योगांमध्ये ९० टक्के रोजगार स्थानिकांना मिळाल्याचा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा दावा हे या फसवणुकीचे उदाहरण आहे. त्यामुळे काँग्रेसने राज्य सरकारचे ‘फसवणीस सरकार’ हे केलेले नामकरण यथायोग्य आहे, असल्याचे प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले.
गांधी भवन येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत सावंत म्हणाले की, सरकारच सातत्याने खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहे. अमरावती येथे बोलताना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा सत्तेत आल्यावर महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करणारच, असे म्हटले आहे. २०१४ साली सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्री वारंवार हेच सांगत आहेत. २०१५ मध्ये मुख्यमंत्र्यांनी पुढील ५ वर्षांत २५ हजार गावे दुष्काळमुक्त करू म्हटले होते. २०१७ मध्ये बोलताना त्यांनी दोन वर्षांत राज्य दुष्काळमुक्त करू असे म्हटले होते, तर २०१८ मध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांनी २०१९ला महाराष्ट्र दुष्काळमुक्त करू, असे म्हटले होते, तर याच वर्षी पंतप्रधानांनी राज्यातील १६ हजार गावे दुष्काळमुक्त झाल्याचे म्हटले होते. गुरुवारी पुन्हा मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र दुष्काळमुक्त करू, असे आश्वासन दिले. यावरून राज्याला दुष्काळमुक्त करण्यात ते अपयशी ठरले, याची कबुली त्यांनी स्वत:च दिली. म्हणूनच काँग्रेसने ‘फसवणीस सरकार’ हे केलेले नामकरण योग्य आहे.