Join us

पंढरपुरात अत्याधुनिक मंडप, भगूरला थीमपार्क; ३०५ कोटींच्या आराखड्यांना मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 08:01 IST

पंढरपूर येथील दर्शन मंडप व दर्शन रांग या सुविधेसाठी १२९ कोटी ४९ लाखांच्या कामांचाही समावेश आहे.

मुंबई : विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे ३०५ कोटी ६३ लाखांच्या आराखड्यांना मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यात पंढरपूर येथील दर्शन मंडप व दर्शन रांग या सुविधेसाठी १२९ कोटी ४९ लाखांच्या कामांचाही समावेश आहे.

भगूर येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित थीमपार्क साकारण्यात येईल. त्यासाठीच्या ४० कोटींच्या प्रस्तावास, तसेच पहिल्या टप्प्यातील १५ कोटींच्या तरतुदीस मान्यता दिली. अमळनेरच्या मंगळग्रह देवस्थानाच्या २५ कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता मिळाली. कोयना जलाशय मौजे मुनावळे येथील जलक्रीडा पर्यटन सुविधेसाठी ४७ कोटींच्या अतिरिक्त मागणीस मान्यता देण्यात आली.

दर्यापूर येथील संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी ऋणमोचन येथील १८ कोटींचा विकास आराखडा, तसेच बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथगडच्या विकास आराखड्यातील २ कोटी ६७ लाखांच्या कामास मान्यता देण्यात आली. शहीद तुकाराम ओंबळे यांच्या मूळगावी स्मारक उभारण्यासाठी १५ कोटींच्या निधीस मान्यता दिली आहे.

दोन हेक्टरवर असणार थीमपार्क स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या निवासस्थानाच्या जवळच दोन हेक्टरवर थीमपार्क साकारण्यात येईल. सावरकर यांचा जीवन प्रवास सादर केला जाणार आहे.

असा असेल दर्शन मंडप 

पंढरपूरमध्ये उभारलेल्या जाणाऱ्या सुमारे १६ हजार चौरस मीटरच्या दर्शन मंडपात पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर सहा हजार भाविकांची सोय करण्यात येईल. स्कायवॉक पद्धतीची एक किलोमीटरची दर्शन रांगही असेल. मंडप आणि रांगेत पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, लिफ्ट, वैद्यकीय सुविधा, अन्नछत्राच्या माध्यमातून जेवण उपलब्ध करून दिले जाईल. 

टॅग्स :पंढरपूरनाशिकएकनाथ शिंदे