जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 07:11 IST2025-11-01T06:33:23+5:302025-11-01T07:11:33+5:30
राज्यात लवकरच सुरू होणार रणधुमाळी

जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयोग पुढील आठवड्यात करेल, अशी दाट शक्यता आहे. जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक होईल हे जवळपास निश्चित झाले असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
६ किंवा ७ नोव्हेंबरला आयोग पत्र परिषद घेऊन नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करेल, असे मानले जाते.
तयारीचा घेतला आढावा
राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठीच्या तयारीचा आढावा घेतला. जिल्हाधिकाऱ्यांच्या अपेक्षाही जाणून घेतल्या. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आयोगाने आधी जिल्हा परिषद निवडणूक घ्यायची की नगरपालिका याबाबत मतेही जाणून घेतली. २४८ नगरपालिका आणि ४२ नगर पंचायती यांचा त्यात समावेश आहे. यावेळी नगराध्यक्ष हे थेट जनतेतून निवडले जाणार आहेत.
आधी नगरपालिका कशामुळे?
ग्रामीण महाराष्ट्रात अतिवृष्टी व पुरामुळे मोठे नुकसान झाले असून शेतकरी व सामान्य नागरिक त्यातून आतासे सावरत आहेत. त्यातच काही भागात गेल्या आठ-पंधरा दिवसांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. या पार्श्वभूमीवर आधी जि. प. निवडणूक घ्यावी का याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संमिश्र मते व्यक्त केली. अतिवृष्टीग्रस्त भागातील जिल्हाधिकाऱ्यांनी लगेच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक घेण्यासारखी स्थिती नाही असे मत नोंदविले. या पार्श्वभूमीवर नगरपालिकांची निवडणूक आधी होईल. घोषणा पुढील आठवड्यात केली जाईल. नोव्हेंबरअखेर एकाच दिवशी मतदान होईल, असेही सूत्रांनी सांगितले. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी येत्या तीन-चार दिवसांत राज्य सरकार नगरपालिकांच्या विकासासाठी काही घोषणा करण्याची शक्यता आहे.