लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 08:24 IST2026-04-05T08:22:48+5:302026-04-05T08:24:47+5:30

अपघातातील मृत प्रवाशाच्या कुटुंबीयांना आठ लाखांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश

Standing near the door of a local train is not negligence; High Court rules | लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय

लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईतील लोकलमध्ये प्रारंभिक स्थानकाव्यतिरिक्त इतर स्थानकांवर चढणाऱ्या प्रवाशांना क्वचितच बसण्यासाठी जागा मिळते. अगदी प्रारंभिक स्थानकावरही जागा मिळवण्यासाठी प्रवाशांना धावपळ करावी लागते. त्यामुळे, विशेषत: मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करताना दरवाजाजवळ उभे राहणे हे निष्काळजीपणाचे कृत्य मानता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवित मुंबई उच्च न्यायालयाने कल्याण - डोंबिवली दरम्यान प्रवास करताना धावत्या गाडीतून पडून मृत्यू झालेल्या प्रवाशाच्या कुुटुंबीयांना ८ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाला दिले.

सेल्समन म्हणून काम करणारे बाळकृष्ण भंडारी यांचा ठाकुर्ली ते डोंबिवली रेल्वे स्थानकामध्ये २९ जानेवारी २०१२ रोजी पडून मृत्यू झाला. २०१९ मध्ये रेल्वे न्यायाधिकरणाने त्यांच्या कुटुंबीयांचा दावा फेटाळला. त्यामुळे कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

याप्रकरणी रेल्वे व्यवस्थापक आणि आरपीएफने सादर केलेल्या अहवालात बाळकृष्ण यांचा मृत्यू धावत्या  ट्रेनमधून पडून झाल्याचे नमूद केले. तर, स्टेशन मास्तर आणि जीआरपीने सादर केलेल्या अहवालात बाळकृष्ण यांचा मृत्यू प्लॅटफॉर्मच्या कडेला उभा राहिल्याने त्यांना एका ट्रेनने खेचल्याने झाल्याचे म्हटले आहे. सरकारी यंत्रणांच्या अहवालात असलेली तफावत अधोरेखित करत न्यायालयाने रेल्वे प्रशासनाकडे हा मृत्यू नेमके कशामुळे झाला, याचे ठोस कारण नसल्याने त्यांच्या कुटुंबियांना ८ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले.
स्टेशन मास्तरने दिलेला अहवाल योग्य आहे, असे जरी गृहित धरले तरी नुकसान भरपाई दयावी लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. 

पट्टीसाठी लाल रंगाचा विचार करण्याची गरज

प्लॅटफॉर्मवर एक पिवळी पट्टी  असते, जी प्रवाशांना ती ओलांडू नये आणि तिच्या मागे उभे राहावे यासाठी इशारा देण्यासाठी असते. मात्र, ही पट्टी असली तरी तिचा उद्देश कुठेही स्पष्टपणे नमूद केलेला नाही. तसेच, प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारची कोणतीही घोषणा किंवा सूचना करण्यात येत नाही. प्राधिकरणांनी याबाबत आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. घोषणा करणे किंवा प्लॅटफॉर्मवरील पोलिस अधिकाऱ्यांनी प्रवाशांनी ही पट्टी  ओलांडू नये याची दक्षता घेणे आवश्यक आहे. काही वेळा ही पिवळी पट्टी फिकी पडलेली असल्यामुळे दिसूनही येत नाही. त्यामुळे, झेब्रा क्रॉसिंगप्रमाणे तिचे नियमितपणे रंगकाम करणे आवश्यक आहे. तसेच, प्रवासी ‘लक्ष्मण रेषा’ ओलांडत आहेत आणि धोक्याच्या क्षेत्रात प्रवेश करत आहेत, हे स्पष्ट करण्यासाठी ‘लाल’ रंगाचा विचार करण्याची गरज आहे, अशी सूचना न्यायालयाने केली.

जपानी नागरिकांप्रमाणे शिस्त हवी

जबाबदार प्रवासी म्हणून आपल्यामध्ये नागरी शिस्त रुजवण्याची गरज आहे, जशी जपानी नागरिकांमध्ये आढळते. सामान्यत:, एखादी जलद गाडी ज्या स्थानकावर थांबत नाही त्या स्थानकातून जात असताना, प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांनी कडेला उभे राहू नये यासाठी घोषणा केली जाते. मात्र, ज्या स्थानकांवर गाडी थांबते, त्या वेळी अशी घोषणा केली जात नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे,असे मत न्यायालयाने व्यक्त केले.

Web Title : लोकल ट्रेन के दरवाजे पर खड़ा होना लापरवाही नहीं: उच्च न्यायालय

Web Summary : उच्च न्यायालय ने रेलवे को मृतक के परिवार को ₹8 लाख का मुआवजा देने का निर्देश दिया। ट्रेन में भीड़ के कारण दरवाजे पर खड़ा होना लापरवाही नहीं है। न्यायालय ने प्लेटफॉर्म सुरक्षा में सुधार का सुझाव दिया, जिसमें दृश्य चिह्नों को शामिल किया गया है, और दुर्घटनाओं को रोकने के लिए यात्रियों के लिए नागरिक अनुशासन पर जोर दिया गया है।

Web Title : Standing near local train door isn't negligent: High Court

Web Summary : High Court directs Railways to pay ₹8 lakh compensation to deceased's family. Standing at train door isn't negligence due to overcrowding. Court suggests platform safety improvements, including visible markings, and emphasizes civic discipline for passengers to prevent accidents.