Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 09:27 IST2025-06-18T09:25:58+5:302025-06-18T09:27:13+5:30
Dharavi project: धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय; तीन मेट्रो प्रकल्पांसाठी कर्ज घेण्यास मुदतवाढ

Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी मुंबईतील मोक्याच्या जागा अदानी उद्योग समूहाच्या विशेष हेतू कंपनीला दिल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाने कंपनी आणि अन्य यंत्रणा दरम्यानच्या भाडेपट्टा करारावरील मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत दिली आहे. धारावीचा पुनर्विकास विशेष हेतू कंपनीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. अशा अत्यावश्यक प्रकल्पांसाठी मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचे किंवा ते माफ करण्याचे धोरण यापूर्वीच निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईतील मेट्रो मार्ग-२ अ (दहिसर पूर्व ते डी.एन. नगर), २ ब (डी. एन. नगर ते मंडाळे) आणि मेट्रो मार्ग-७ (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) या प्रकल्पांसाठी एशियन डेव्हलपमेंट बैंक आणि न्यू डेव्हलपमेंट बैंक या वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या संस्थांकडून या मार्गासाठी एकूण १०७५.७४ मिलीयन डॉलर कर्ज मंजूर करण्यात आले आहे
मेसर्स रायगड पेण ग्रोथ सेंटरला मुद्रांक शुल्कात सवलत
१) एमएमआरडीए आणि मेसर्स रायगड पेण ग्रोथ सेंटर लि. यांच्या संयुक्त प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीवरील मुद्रांक शुल्कात ५० टक्के सवलत देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
२)पेण तालुक्यात स्थापन होणाऱ्या या ग्रोथ सेंटरचा समावेश नवीन शहर 3 विकास प्राधिकरण क्षेत्रात होतो. या प्रकल्पाच्या माध्यमातून एमएमआरडीएने एकात्मिक वसाहत धोरणानुसार १२१७.७१ एकर जमीन विशेष उद्देश संस्थेच्या नावे नोंदविण्याचा प्रस्ताव दिला आहे.
३)तिसरा हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास फिनटेक कंपन्या, शैक्षणिक व आरोग्य सुविधा, करमणूक उद्याने, परवडणारी घरे, व्यावसायिक हब, किरकोळ विक्री आणि बांधकाम क्षेत्राचा विकास होणार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर मोठ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.