आर्थिक पेचात सापडलेल्या एसटीला निधीची प्रतीक्षा; अधिवेशनात महामंडळाच्या प्रश्नांवर चर्चा नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 06:14 IST2024-12-23T06:14:17+5:302024-12-23T06:14:26+5:30
महागाई भत्त्याचे शंभर कोटी प्रलंबित

आर्थिक पेचात सापडलेल्या एसटीला निधीची प्रतीक्षा; अधिवेशनात महामंडळाच्या प्रश्नांवर चर्चा नाही
मुंबई: राज्य परिवहन (एसटी) महामंडळाला दररोज सुमारे तीन ते साडेतीन कोटींचा तोटा होत आहे. यामुळे एसटीचे चाक आर्थिक संकटात सापडले आहे. एसटी या संकटातून एसटीला बाहेर काढण्यासाठी निधीची प्रतीक्षा आहे. मात्र, अधिवेशनात एसटीच्या प्रश्नाबाबत चर्चा झाली नसल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात कुठल्याही पक्षाच्या सदस्याने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत याबाबत प्रश्न उपस्थित केला नसल्याचे बरगे म्हणाले. स्वमालकीच्या तीन हजारांहून जास्त बस घेण्याची घोषणा करून राज्यात ३ परिवहन मंत्री बदलले, परंतु ताफ्यात गाड्या अद्याप दाखल झालेल्या नाहीत.
महागाई भत्त्याचे शंभर कोटी प्रलंबित
कर्मचाऱ्यांना मध्यंतरी सरकारने ६,५०० रुपयांची सरसकट वेतनवाढ केली होती. त्याचा एप्रिल २०२० पासूनचा फरक देण्यासाठी ३,१०० कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. त्याचप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा जानेवारी २०२४ पासूनचा अंदाजे १०० कोटी रुपये इतका महागाई भत्ता प्रलंबित आहे. भविष्य निर्वाह निधी व उपदान अशी एकूण १,९०० कोटी रुपयांची रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करूनसुद्धा निधी उपलब्ध नसल्याने संबंधित ट्रस्टकडे भरणा करण्यात आलेली नाही. त्याबद्दल कुठल्याही सदस्याने प्रश्न उपस्थित केला नसल्याची खंतही बरगे यांनी व्यक्त केली.