Join us

ST Strike: धक्कादायक! आंदोलनातील ST कर्मचाऱ्याचा मृत्यू, कामगारांचा तीव्र संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 09:46 IST

शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांकडून झालेल्या हल्ल्यानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे

मुंबई - राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास हिंसक वळण लागल्यानंतर आता आंदोलक आणि सरकार, पोलीस असा वाद पेटल्याचं दिसून येत आहे. पोलिसांनी मध्यरात्री जबरदस्तीने आझाद मैदानातील आंदोलकांना तेथून हाकलून लावले. पोलिसांच्या या दडपशाहीमुळे आंदोलक कर्मचाऱ्यांना संताप व्यक्त केला आहे. या कारवाईदरम्यान, एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. महेश लोले असं या एसटी कर्मचाऱ्याचं नाव असून ते कोल्हापूर कागल आगारातील कर्मचारी आहेत. 

शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांकडून झालेल्या हल्ल्यानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. त्यातच, पोलिसांनी 107 आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून गुणरत्न सदावर्तेंनाही अटक केली आहे. त्यामुळे, कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. या दरम्यान, शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास महेश लोले नामक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईमुळे त्यांचा बीपी वाढला होता, या अस्वस्थेतूनच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप इतर कर्मचाऱ्यांनी केला आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी आंदोलन केल्यानंतर मुंबई पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदान खाली करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी बाहेर निघण्यास नकार दिला होता. वकील गुणरत्न सदावर्ते सांगतील तोपर्यंत आम्ही बाहेर जाणार नाही, अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली होती. मात्र, मध्यरात्री पोलिसांनी कारवाई करत २५० कर्मचाऱ्यांना बाहेर काढले असून यामधील ५ कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आझाद मैदानातून बाहेर काढल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकात बसून ठिय्या देण्यास सुरुवात केली आहे. शेकडो कर्मचारी सीएसएमटी स्थानकात बसून सरकारविरोधात घोषणाबाजी देत आहेत. याठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील वाढविण्यात आला आहे.  

 

टॅग्स :एसटी संपमुंबईकोल्हापूरमृत्यूछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस