Join us

ST Strike : 'शरद पवारांचे गेल्या 40 वर्षांपासून ST कामगारांशी जिव्हाळ्याचे संबंध'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 08:03 IST

मुंबईतील या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन महामंडळाचे अधिकारी देखील उपस्थित होते. पण, या बैठकीतही ठोस निर्णय झाला नाही.

ठळक मुद्देगेल्या 40 वर्षांपासून एस. टी. कामगारांच्या समस्या आणि एस.टी. कामगारांशी शरदचंद्र पवार यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या घरी किंवा त्यांच्या समवेत बैठक झाल्यास त्यात वावगे काय?, असा प्रश्नही आव्हाड यांनी विचारला

मुंबई - राज्यभर मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. अनेक प्रयत्न करुनही या संपावर अद्यापही तोडगा निघाला नाही. त्यामुळे, अखेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच पुढाकार घेऊन परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासोबत चर्चा केली. पवार-परब यांच्यात जवळपास चार तास बैठक झाली. मात्र, ठोस निर्णय झाला नाही, त्यामुळे शरद पवार यांच्या उपस्थितीतीवरुन काहींनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावर आता, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलंय.

मुंबईतील या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन महामंडळाचे अधिकारी देखील उपस्थित होते. पण, या बैठकीतही ठोस निर्णय झाला नाही. या बैठकीनंतर अनिल परब यांनी माध्यमांना बैठकीत झालेल्या चर्चेबाबत माहिती दिली. अनिल परब म्हणाले, 'गेले काही दिवस एसटीचा संप सुरू आहे. एसटीच्या संपामुळे अनेकांचे हाल होत आहेत. आज शरद पवार यांनी मला या संदर्भात बोलावलं होतं. त्यांनी आमच्याकडून सर्व परिस्थिती समजून घेतली. यावर काय मार्ग निघू शकतात, त्यावर चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर, काहींनी शरद पवारांच्या बैठकीबाबत प्रश्न उपस्थित केले. त्यावर, जितेंद्र आव्हाड यांनी एसटी कामगार आणि शरद पवार यांचं जिव्हाळ्याचं नातं असल्याचं सांगितलं.  गेल्या 40 वर्षांपासून एस. टी. कामगारांच्या समस्या आणि एस.टी. कामगारांशी शरदचंद्र पवार यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या घरी किंवा त्यांच्या समवेत बैठक झाल्यास त्यात वावगे काय?, असा प्रश्नही आव्हाड यांनी विचारला. तसेच, ऊसतोड कामगारांच्या बैठकीचा अंतिम मसुदा देखील पवारांच्या उपस्थितीत कै. गोपीनाथ मुंडे मंजूर करून घ्यायचे. मुंडे यांना ऊसतोड कामगारांबद्दल प्रचंड सहानुभूती होती आणि शरदचंद्र पवार यांनीही ऊसतोड कामगारांची जबाबदारी स्वीकारली होती. नेत्यांनी अत्यंत जबाबदारीने श्रमिकांचा विचार केला पाहिजे. त्यांचे शोषण थांबवल पाहिजे. जे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्यांच्या शोषणाला, त्यांना उद्ध्वस्त करायला कारणीभूत ठरतात; त्यांना खड्यासारख बाहेर ठेवलं पाहिजे, तेच काम शरद पवार करतील, अशी अपेक्षाही आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.  न्यायालयाचा निर्णय मान्य असेल

परब पुढे म्हणाले, 'आजच्या बैठकीत वेतन वाढीसंदर्भातही चर्चा झाली, येत्या हिवाळी अधिवेशनात त्यावर चर्चा होईलच. त्यानंतर बिझनेस अँडव्हायजरी कमिटीसमोर या विषयावर चर्चा होईल. आम्हाला जी माहिती शरद पवारांना द्यायीच होती, ती आम्ही त्यांना दिली. कामगारांचे दुसरे प्रश्न काय आहेत? त्यांच्या वेतन वाढीचा विषय आहे. बाकीच्या राज्यात कशा पद्धतीने परिवहन चालतं, त्यांचे पगार काय आहेत? या सगळ्यांवरही चर्चा आज केली. राहिला विषय एसटीच्या विलीनीकरणाचा, तर तो मुद्दा हायकोर्टाच्या समितीसमोर आहे. कोर्ट देईल तो निर्णय स्वीकारणार,' अशीही माहिती परब यांनी दिली. 

 

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसएसटी संपजितेंद्र आव्हाड