ST Strike: “गुणरत्न सदावर्तेंच्या आक्रस्ताळेपणामुळे एसटी कर्मचाऱ्यांची चूल बंद होण्याची वेळ आलीय”
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 16:42 IST2022-01-10T16:41:58+5:302022-01-10T16:42:56+5:30
ST Strike: गुणरत्न सदावर्ते हेच नैराश्यात असून, लोकांना भडकवण्याचे काम ते करत आहेत.

ST Strike: “गुणरत्न सदावर्तेंच्या आक्रस्ताळेपणामुळे एसटी कर्मचाऱ्यांची चूल बंद होण्याची वेळ आलीय”
मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. काही ठिकाणी एसटी सेवा सुरू झाली असली तरी बहुतांश ठिकाणी एसटी सेवा बंद आहे. या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी कृती समितीच्या सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. तसेच परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) आणि कृती समितीमध्ये एक बैठकही झाली. यानंतर बोलताना कृती समितीच्या काही सदस्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
विधिज्ञ गुणरत्न सदावर्तेंच्या आक्रस्ताळेपणामुळे एसटी कर्मचाऱ्यांची चूल बंद होण्याची वेळ आली आहे. कर्मचाऱ्यांच्या डोक्यामध्ये वकील गुणरत्न सदावर्तेंनी विलनीकरणासंदर्भात भ्रम निर्माण केला आहे. कर्मचारी नैराश्यात असल्याचे वकील म्हणत आहेत. पण गुणरत्न सदावर्ते हेच नैराश्यात आहेत. लोकांना भडकवण्याचे काम ते करत आहेत. दोन महिने सुरु असलेल्या संपामुळे सर्वसामान्य कर्मचाऱ्याची रोजीरोटी बंद होण्याची वेळ आली आहे, असे सुनील निरभवणे यांनी म्हटले आहे.
आपली एसटी टिकली पाहिजे हा विचार केला पाहिजे
शरद पवार आणि अनिल परब यांनी पगारवाढीमध्ये ज्या त्रुटी आहेत त्या दूर करण्याची हमी दिली आहे. ज्यांची नोकरी गेली आहे भविष्यात त्यांची नोकरी देखील वाचणार आहे. त्यामुळे कामगारांनी आपली एसटी टिकली पाहिजे हा विचार केला पाहिजे, असेही ते म्हणाले. तसेच संपाची नोटीस दिलेले आणि नोटीस न दिलेल्या संघटनेचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत ते बैठकीसाठी उपस्थित होते. विलनीकरणाबाबत योग्य निर्णय आला तर ते करण्यात येईल असे अनिल परब यांनी सांगितले आहे, अशी माहिती कृती समितीच्या संदीप शिंदे यांनी दिली.
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांना कारवाईबाबत आम्ही तीन वेळा मुदत दिली होती. दिलेल्या मुदतीमध्ये कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार नसल्याचे आम्ही सांगितले होते. आतापर्यंत ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झालेली नाही, असे कर्मचारी कामावर आल्यावर त्यांच्यावर कारवाई होणार नाही. अफवा पसरवून आणि भीती निर्माण करुन कर्मचाऱ्यांना कामावर जाण्यापासून रोखले जात आहे. एसटी सुरु झाल्यांनतर कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांबाबत काय निर्णय घ्यायचा यावर चर्चा करण्यात येणार आहे, असे अनिल परब यांनी सांगितले.