आधीच माहिती मिळाल्याने ST स्टॅण्ड झाले चकाचक; केवळ उपचार म्हणून अधिकाऱ्यांकडून पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 07:33 IST2025-07-29T07:32:44+5:302025-07-29T07:33:01+5:30
अधिकाऱ्यांच्या स्वागताला चक्क रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.

आधीच माहिती मिळाल्याने ST स्टॅण्ड झाले चकाचक; केवळ उपचार म्हणून अधिकाऱ्यांकडून पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी कुर्ला, परळ, दादर आणि मुंबई सेंट्रल स्थानकांतील स्वच्छता आणि व्यवस्थापनाची तपासणी केली. मात्र या सर्वेक्षणाची माहिती डेपो मॅनेजरला आधीच मिळाल्याने एसटी स्टॅण्ड व परिसर चकाचक केल्याचे दिसून आले. तसेच अधिकाऱ्यांच्या स्वागताला चक्क रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.
बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचे दुसरे सर्वेक्षण सुरू झाले आहे. सोमवारी नाशिक विभागाचे विभाग नियंत्रक किरण पाटील आणि सांख्यिकी अधिकारी मिलिंद ताणपाटील यांनी कुर्ला, परळ, दादर आणि मुंबई सेंट्रल स्थानकांतील स्वच्छता आणि व्यवस्थापनाची तपासणी केली. मात्र ही पाहणी म्हणजे केवळ एक उपचार असल्याचे चित्र ‘लोकमत’च्या प्रतिनिधीला दिसले.
मुळात हे सर्वेक्षण अचानक करणे अपेक्षित असते. मात्र डेपो मॅनेजरला या तपासणीची आधीच माहिती होती. त्यामुळे काही प्रमाणात स्वच्छता केली होती. त्यामुळे या स्थानकांची सत्य परिस्थिती कशी समजणार, असा सवाल केला जात आहे.
पथकामध्ये कोण?
एसटी महामंडळाचे अधिकारी आणि एसटी मित्र तसेच एक त्रयस्थ व्यक्तीकडून मूल्यांकन केले जाते.
५६८ स्थानकांची दर तीन महिन्यांनी पाहणी
एसटी महामंडळाच्या राज्यभरातील ५६८ स्थानकांची दर तीन महिन्यांनी पाहणी केली जाते. त्यानुसार या सर्व स्थानकांचे वर्षातून चार वेळा सर्वेक्षण केले जातात. १०० पैकी गुण दिले जातात. डेपो मॅनेजरला गुण सांगितले जातात. त्यानुसार पुढच्या सर्वेक्षणामध्ये सुधारणा होणे अपेक्षित असते. ५० पेक्षा कमी गुण असलेल्या बसस्थानकाच्या प्रमुखांना म्हणजेच ते बसस्थानक ज्या आगार कक्षेत येते त्या डेपो मॅनेजरला कारणे दाखवा नोटीस पाठवली जाते.
सर्वेक्षणाचे निकष
एसटी स्थानकांची व प्रसाधनगृहांची स्वच्छता
एसटी स्थानकाचे व्यवस्थापन
हरित बसस्थानक