गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 06:02 IST2025-07-30T06:00:19+5:302025-07-30T06:02:53+5:30
प्रत्येक बसमध्ये केवळ ४० प्रवासीच असावेत, असे नियोजन असून, २३ ऑगस्टपासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बस स्थानकातून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गणपती उत्सवाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने यंदा २३ ते २७ ऑगस्ट या कालावधीत ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. २३ ऑगस्टपासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बस स्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
मुंबईतून कोकणात थेट आपल्या गावी अगदी वाडी-वस्तीपर्यंत पोहोचता येत असल्याने, अनेक जण एसटीच्या प्रवासाला पसंती देतात. यंदा मुंबई विभागातून स्वतःच्या ६०० बस कोकणात सोडण्यात आल्या आहेत, तसेच नाशिक, पुणे, अमरावती, छ.संभाजीनगर, नागपूर अशा विविध विभागांच्या माध्यमातूनही ४ हजारांपेक्षा जास्त बस मागविण्यात आल्या आहेत. या बस चांगल्या आणि सुस्थितीतील असल्याच्या विशेष दक्षता घ्यावी. तसेच या बस गळक्या असणार नाहीत आणि स्वच्छ असतील याची काळजी घ्यावी, असे विभाग नियंत्रकांना सांगण्यात आले आहे. तसेच प्रत्येक बसमध्ये केवळ ४० प्रवासीच असावेत, असे नियोजन करण्यात येणार असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले. जादा वाहतुकीसाठी पाठविण्यात येणाऱ्या बसची डिझेल टाकी पुर्ण भरुन मुंबईमध्ये पाठवाव्या लागणार आहेत.
अशी आहे तयारी
एसटीची वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी बस स्थानक आणि बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत, तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथकेही तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर, प्रवाशांसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधनगृह उभारण्यात येणार आहेत.
२३ ते २७ ऑगस्ट बुकिंग
विभाग ग्रुप वैयक्तिक
मुंबई २२९ २१३
ठाणे २७५ ३९
पालघर १८२ ३६८
एकूण ७८६ ६२०