Join us  

महापुरामुळे एसटीचे तब्बल १०० कोटीचे नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 6:38 PM

एसटीचा  दररोज १८००० बसेसच्या माध्यमातून ५५ लाख किलोमीटर इतका प्रवास होतो.

मुंबई : महाराष्ट्रात सर्वदूरपर्यंत गेली १० दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे भयंकर पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरपरिस्थितीचा  थेट फटका राज्याची लोकवाहिनी असलेल्या एसटीला देखील बसला आहे. मराठवाडा वगळता इतर भागामध्ये एसटीची दैनंदिन वाहतूक बहुतांश  ठप्प झाली आहे. त्यामुळे एसटीला  दररोजचा ४ ते ५ कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत असून आतापर्यंत गेल्या १० दिवसात ५० कोटी रूपयाचा महसूल बुडाला आहे. तसेच  अनेक आगार, बसस्थानके,बसेस पाण्यामध्ये अडकल्यामुळे तेथील स्थावर मालमत्तेचे आतोनात नुकसान  झाले आहे. 

पूरपरिस्थिती ओसरल्यानंतरच या स्थावर मालमत्तेच्या नुकसानीचा नक्की आकडा समजू शकेल. मात्र सद्यस्थितीला ५० कोटी रुपयां पेक्षा जास्त  स्थावर मालमत्तेच्या नुकसानीचा अंदाज वर्तविला जात  आहे. एसटीचा  दररोज १८००० बसेसच्या माध्यमातून ५५ लाख किलोमीटर इतका प्रवास होतो. त्यातून सरासरी २२ कोटी रुपये उत्पन्न मिळते. पण गेल्या १० दिवसापासून दररोज एसटीचे किमान १० लाख किलोमीटरच्या  बस फेऱ्या  रद्द होत आहेत. 

साहजिकच त्यामुळे एसटीच्या ४ ते ५ कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. एकट्या कोल्हापूर विभागाचा दैनंदिन महसूल ५० लाख आहे. परंतु गेल्या चार दिवसापासून या विभागाच्या  १२ आगारातून कोणत्याही प्रकारची वाहतूक होऊ शकली नाही. हि परिस्थिती सांगली, सातारा व कोकणातील काही विभागामध्ये आहे. पुढील काही दिवसामध्ये पूर ओसरल्यानंतरच प्रत्यक्ष नुकसानीचा आकडा स्पष्ट होऊ शकेल.  

टॅग्स :एसटीमहाराष्ट्रकोल्हापूर पूर