मुंबई : स्पाईसजेट कंपनीच्या विमानाने गुजरातमधील कांडला येथून उड्डाण केल्यानंतर टेकऑफ घेताना रनवेवरच त्या विमानाचे एक चाक निखळले. मात्र, त्यानंतर विमान एका चाकावर मुंबई विमानतळावर आपातकालीन स्थितीत शुक्रवारी दुपारी ३ वाजून ५१ मिनिटांनी सुरक्षितरित्या उतरले. यावेळी विमानामध्ये ७५ प्रवासी होते. वैमानिकाने विमान कौशल्याने सुरक्षितरित्या उतरवल्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे दोन तास मुंबई विमानतळारील वाहतूक विस्कळीत झाली होती. सायंकाळनंतर ती पुन्हा सुरळीत झाली.
स्पाईसजेट कंपनीच्या ‘बम्बार्डिअर क्यू ४००' या विमानाने कांडला विमानतळावरून २ वाजून ३९ मिनिटांनी उड्डाण केल्यावर काहीच सेकंदात त्याचे एक चाक निखळून ते विमानतळावरच गवतात जाऊन पडले.
ही गोष्ट कांडला विमान वाहतूक नियंत्रण कक्षाच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने संबंधित वैमानिकाशी संपर्क साधत त्याला या गोष्टीची कल्पना दिली.
वैमानिकाने मुंबई विमान वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधत ही बाब निदर्शनास आणून देत मुंबई विमानतळावर आपकालीन स्थितीत विमान उतरविण्याची अनुमती मागितली.
मुंबई विमातळावरील कर्मचाऱ्यांनी तातडीने विमानतळावर आपातकालीन परिस्थिती घोषित करत अग्निशमन दलाचे बंब तसेच अन्य यंत्रणा धावपट्टीजवळ तैनात केल्या. विमानतळाच्या रन-वे २७ वर विमानाचे सुरक्षित लैंडिंग झाले त्यानंतर विमान स्वतःच वैमानिकाने पार्किंगमध्ये नेले.
दुसऱ्या चाकाचे काय झाले?
विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले की, विमानाचे एक चाक निखळल्यानंतर त्याचसोबत दुसरे चाक देखील निखळले जाऊ शकले असते. मात्र, तसे न झाल्यामुळे मोठा अपघात टळला आहे.
मुंबईतच लँडिग का?
कांडला विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर विमानाचे चाक निखळले असले तरी ते पुन्हा कांडला येथे उतरवण्यात आले नाही. याचे कारण म्हणजे, मुंबई विमानतळावरील धावपट्टी ही अधिक मोठी आहे तसेच दुर्घटना हाताळण्याची अत्यंत सुसज्ज व्यवस्था मुंबईत असल्यामुळेच या विमानाला मुंबईत उतरवण्यात आल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.