गुजरातच्या कांडला येथून मुंबईला येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानासोबत शुक्रवारी एक मोठी दुर्घटना होता होता टळली. विमानाने उड्डाण घेताच त्याचे एक चाक तुटून खाली जमिनीवर पडले. या विमानात एकूण ७५ प्रवासी होते. मात्र, सुदैवाने विमान मुंबईमध्ये सुरक्षितपणे उतरले आणि पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला.
विमानाचे चाक खाली पडल्याची माहिती कांडला एटीसीने दिली, त्यानंतर मुंबई विमानतळावर आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली. संध्याकाळी साधारण चार वाजता विमानाचे मुंबईत सुरक्षित लँडिंग झाले.
विमानात होते ७५ प्रवासीस्पाइसजेटच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, "१२ सप्टेंबर रोजी, कांडलाहून मुंबईला जाणाऱ्या स्पाइसजेट 'क्यु४००' विमानाचे एक बाहेरील चाक उड्डाण घेतल्यानंतर धावपट्टीवर पडलेले आढळले. मात्र, विमानाने आपला मुंबईचा प्रवास सुरू ठेवला आणि ते सुरक्षितपणे उतरले आहे. लँडिंगनंतर, विमान टर्मिनलपर्यंत पोहोचले आणि सर्व प्रवासी सुखरूप खाली उतरले."
एटीसी टीमने पाहिले तुटलेले चाकविमानतळ प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "कांडला एटीसीने विमान उड्डाण घेतल्यानंतर काहीतरी खाली पडताना पाहिले. उड्डाणानंतर त्यांनी वैमानिकाला याची माहिती दिली आणि एटीसीच्या जीपला ती वस्तू आणण्यासाठी पाठवले."
जेव्हा एटीसीची टीम तिथे पोहोचली, तेव्हा त्यांना जमिनीवर धातूची कडी आणि एक चाक पडलेले आढळले.