Mumbai Coastal Road: कोस्टल रोडवर 'स्पीड'ला ब्रेक! नियम तोडणाऱ्यांविरुद्ध आता थेट गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 16:06 IST2026-02-01T16:04:52+5:302026-02-01T16:06:46+5:30
मुंबईतील कोस्टल रोडवर गेल्या काही दिवसांत भरधाव वेगामुळे झालेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा फास आवळला आहे.

Mumbai Coastal Road: कोस्टल रोडवर 'स्पीड'ला ब्रेक! नियम तोडणाऱ्यांविरुद्ध आता थेट गुन्हे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: कोस्टल रोडवर गेल्या काही दिवसांत भरधाव वाहनांमुळे अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत. याचत एका तरुणीसह बंदोबस्तावरील पोलिसाचा मृत्यू झाला होता. कोस्टल रोडच्या बोगद्यात काही वाहनांनी थेट १४० चा स्पीड गाठल्याचेही कारवाईतून समोर आले. स्पीड नियंत्रणात आणण्यासाठी वाहतूक विभागाने कारवाईचा फास आवळला आहे. वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्याचा इशाराही वाहतूक पोलिसांनी दिला आहे.
वाहतूक पोलिसांनी ८ सप्टेंबर ते १२ जानेवारीदरम्यान वाहतूक पोलिसांनी ६१ हजार ९८९ ई चालान बजावत कोट्यवधींचा दंड ठोठावला आहे. अनेकदा चालकांचे या मार्गावर भरधाव वेगावरील नियंत्रण सुटते. ओव्हरटेकच्या नादात वाहने एकमेकांवर धडकली आहे. तर, दुसरीकडे, अनेकजण बस लेन, तसेच आपत्कालीन मार्गिकेवरून वाहने नेत असल्याने त्याचाही फटका कोंडीत भर घालून अपघाताला निमंत्रण देत आहे. त्यानुसार या कारवाईत भरधाव वेग, बस लेनचा वापरसंबंधित कारवाईचा समावेश आहे. हे सर्व उल्लंघन एएनपीआर (ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन) कॅमेऱ्यांद्वारे टिपण्यात येत आहे.
बोगद्यात ताशी ६० किमी वेगमर्यादा निश्चित
मुख्य कोस्टल रोडवर ८० किमी/तास, इंटरचेंजरवर ४० किमी/तास आणि बोगद्यात ६० किमी/तास अशी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. रात्री उशिरा किंवा पहाटे, जेव्हा रस्ता मोकळा असतो, तेव्हा सर्वाधिक वेगमर्यादेचे उल्लंघन होते.
ई-चलनद्वारे केलेल्या धडक कारवाईचा परिणाम
एएनपीआर कॅमेरे जुलैअखेरीस कार्यान्वित झाले, तर ई-चलन प्रणाली ४ सप्टेंबरला बोगद्यांसाठी आणि २७ सप्टेंबरला संपूर्ण कोस्टल रोड प्रकल्पासाठी सुरू झाली आहे. त्यानुसार, ई-चलनद्वारे कारवाईचा वेग वाढला आहे. दिवसाला ५०० हून अधिक ई-चलन जारी करण्यात येत आहेत. सप्टेंबर महिन्यात १६ हजार ८५२ चलन जारी केले.
ऑक्टोबरमध्ये हाच आकडा १९,९१६ वर पोहोचला. नोव्हेंबरमध्ये १२ हजार ८७२ वर आला. पोलिसांच्या कारवाईमुळे वेगावर नियंत्रण मिळविण्यास पोलिसांना यश येत आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये हा कारवाईचा आकडा ९,९०९, तर जानेवारीमध्ये ३,२२५ वर आला आहे. वाहतूक पोलिसांच्या धडक कारवाईमुळे येथील वेगावर ब्रेक लागताना दिसत आहे. वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वेगमर्यादा उल्लंघनासाठी दोन हजार रुपये आणि बस लेन वापरल्यास पहिल्या वेळी ५०० रुपये, नंतरच्या वेळेस १,५०० रुपये दंड आकारला जातो.